हायलाइट्स:
- महापुराच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी घेतली पत्रकार परिषद
- राज्य सरकारनं पुनर्वसन धोरण जाहीर करावं – शरद पवार
- राजकीय नेत्यांनी नुकसानग्रस्त भागांचे दौरे टाळावेत; पवारांचा सल्ला
राज्यातील महापुराच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रवादीच्या वतीनं सुरू असलेल्या व येत्या काळात हाती घेतल्या जाणाऱ्या मदतकार्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून त्यांनी यावेळी पूरग्रस्तांना अडीच कोटी रुपयांची मदत जाहीर केली. ही मदत दोन दिवसांत पोहोचवली जाईल, असं त्यांनी सांगितलं. ‘पुनवर्सनाबाबत राज्य सरकार लवकरच धोरण जाहीर करील,’ अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली.
वाचा: सांगलीत महापुरातून वरात! नवदाम्पत्य बोटीतून पोहोचले घरात
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर आता विरोधी पक्षाचे नेतेही व सरकारमधील काही मंत्रीही पूरग्रस्त भागांमध्ये जात आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सर्वांनाच महत्त्वाचं आवाहन केलं. ‘माझा पूर्वीचा अनुभव, विशेषत: लातूरच्या वेळचा अनुभव आहे. अशा घटनानंतर अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जातात. मी लातूरला असताना, आम्ही सगळे जण कामात होतो, पंतप्रधान येत होते. त्यावेळी मी पंतप्रधानांना सांगितलं दहा दिवस येऊ नका. तुम्ही आला तर यंत्रणा तिकडे लावावी लागेल. माझी विनंती मान्य करून तेव्हा पंतप्रधान दहा दिवसानंतर आले होते, आताही तशीच परिस्थिती आहे. सरकारी यंत्रणा पुनर्वसनाच्या कामात व्यग्र आहेत. त्यांचं लक्ष विचलित होईल, त्यामुळं असे दौरे टाळावेत, असं पवार म्हणाले.
वाचा: मुख्यमंत्र्यांचा अभिमान वाटतो; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याकडून कौतुक
‘कोणत्याही नेत्यांनी प्रसंगावधान राखावं. मी सुद्धा आता दौऱ्यावर जात नाही. त्याचं कारण बाकीची यंत्रणा फिरवावी लागते. आपल्या भोवती यंत्रणा ठेवणं योग्य नाही. दौरे झाल्यामुळं लोकांना धीर मिळतो. पण दौऱ्यामुळं शासकीय यंत्रणेचं काम वाढतं. त्यामुळं दौरे होऊ नये असं मला वाटतं. दौऱ्याला गेल्यामुळं यंत्रणेला त्रास होतो,’ याकडं त्यांनी लक्ष वेधलं.
राज्यपालांना चिमटा
राज्यपाल पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर जाणार आहेत याबाबत विचारलं असता पवारांनी सूचक प्रतिक्रिया दिली. ‘राज्यपाल जात आहेत हे ठीक आहे. त्यांचे व केंद्राचे संबंध चांगले आहेत. ते जास्त मदत आणू शकतात. केंद्रातून मदत मिळवून देण्यासाठी राज्यपालांचा उपयोग व्हावा, असा चिमटा पवार यांनी काढला.
वाचा: मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस; संजय राऊत यांच्या ट्वीटची जोरदार चर्चा