‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरीततृणांच्या मखमलाची, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती’ बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची ही कविता लहानपणी आपण वाचली अथवा ऐकली असेलच. पावसाने न्हावून निघालेली हिरवीगार सृष्टी तुम्ही पाहिली असेल. तुफान पाऊस अंगावर खेळवत गावामध्ये, रानावनात खेळत, सप्तरंगी इंद्रधनुष्यही पाहिले असालच. हे सर्व आपण बघू शकतो कारण आपल्याकडे दृष्टी आहे. परंतु जरा विचार करा ज्यांच्याकडे ही पाहण्याची दृष्टीच नाही त्यांचे काय?… आपण मरणोत्तर नेत्रदानाने नवी दृष्टी देऊन त्यांच्या जीवनात प्रकाश आणू शकतो !
डोळ्यांच्या अनुवंशिक आजारांमुळे, जंतुसंसर्गामुळे, अपघातामुळे व डोळ्यांची योग्य निगा न राखल्यामुळे अकाली अंधत्व येऊ शकते. यापैकी जवळपास ८० टक्के अंधत्व टाळता येऊ शकते अथवा उपचाराने बरे होण्यासारखे असते. आपल्या देशातील अंध ५ व्यक्तींपैकी १ म्हणजे साधारणत: ३ लाख लोक हे बुबुळाच्या आजाराने ग्रस्त आहेत. दरवर्षी त्यामध्ये नव्याने ४० हजार ते ५० हजार रुग्णांची भर पडत असते. यापैकी बहुसंख्य रुग्णांना बुबुळरोपण (नेत्ररोपण) शस्त्रक्रियेने दृष्टी प्राप्त होऊ शकते. दरवर्षी १ लाख नेत्राची आवश्यकता आहे. परंतु जवळपास २६ हजार बुबुळांचे नेत्रदान होते. अंध बांधवासाठी लागणारे नेत्र व नेत्रदातांकडून गोळा होणारे नेत्र यांची तफावत भरून काढण्यासाठी जवळपास ७४ ते ७५ हजार बुबुळांची आवश्यकता आहे.
त्यामुळे नेत्रदानाचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे. मरणोत्तर नेत्रदान आपल्या परिवाराची परंपरा बनवूया व आपल्या नातेवाईकांना देखील आपल्या संकल्पात सहभागी करुया.
अंधत्व येण्याची कारणे
अंधत्व वेगवेगळ्या प्रकारचे असते. दृष्टीदोष काचबिंदू, बुबुळांचे आजार, मोतिबिंदू, मागील पडद्याचे आजार असतात. त्यामध्ये बुबुळाच्या आजारामुळे भारतात २ लाखांवर अंध आहेत. बुबुळाच्या आजारामुळे येणारे अंधत्व मुख्यतः कॉर्निअल अल्सर, डोळ्याला होणाऱ्या इजा, ‘अ’ जीवनसत्वाचा अभाव, केमिकल बर्न्स, अनुवंशिकतेमुळे होणारे बुबुळाचे आजार, शस्त्रक्रियेनंतर बुबुळाला येणारी सूज आदी कारणामुळे होते. या सर्व कारणामुळे येणाऱ्या अंधत्वावर बुबुळरोपण शस्त्रक्रिया हा एक आशेचा किरण आहे.
नेत्रदान कोणी करावे?
मरणोत्तर नेत्रदानास वयाची अट नाही. नेत्रदान कोणत्याही जातीच्या, धर्माच्या, वंशाच्या, पंथाच्या व्यक्तीला करता येते. कोणताही रक्तगट असलेल्या व्यक्ती नेत्रदान करु शकतात. मोतीबिंदू, काचबिंदुच्या शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांनाही नेत्रदान करता येते. नेत्रदानाची शस्त्रक्रिया केलेले रुग्णही मरणोत्तर नेत्रदान करु शकतात.
नेत्रदान करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी:
मरणोत्तर नेत्रदान सहा तासांच्या आत करावयास हवे, त्याकरीता त्वरीत नेत्रपेढीशी संपर्क साधावा. नेत्रदात्याच्या खोलीतील पंखे बंद करावेत. डोळ्यामध्ये (अँटिबायोटिक्स) औषध घालावे. अथवा पाण्याची पट्टी ठेवावी. जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क साधावा. पुणे शहरात ससून सर्वोपचार रुग्णालयाबरोबरच अन्य नेत्रपेढ्या आहेत. नेत्ररोपण शस्त्रक्रिया (किरॅटोप्लास्टी) ससून रुग्णालयाच्या नेत्र विभागात मोफत केली जाते.
नेत्रदानाविषयी वस्तुनिष्ठता
नेत्रदान केल्यानंतर चेहऱ्यास विद्रुपता येते असा गैरसमज आहे. डोळ्याच्या खोबणीत मऊ कापूस किंवा प्लास्टिकचा डोळा ठेऊन पापण्या व्यवस्थित बंद करता येतात. शरिरातील एखादा अवयव काढल्याने पाप लागते हा गैरसमज असून उलट नेत्रदानाद्वारे दोन व्यक्तीचे संपूर्ण जीवन उभे करण्याचे किती तरी मोठे पुंण्याचे काम होते. म्हणूनच म्हणतात ‘मरावे परि नेत्ररुपी उरावे’.
नेत्रशस्त्रक्रियेत बकरीचा डोळा बसवता येतो हा गैरसमज आहे. बकरीच्या डोळ्याची रचना व मानवाच्या डोळ्याच्या रचनेत मुलभूत फरक असतो. शस्त्रक्रियेदरम्यान कॉर्निया फक्त बदलला जातो. तेव्हा तो डोळा बसवला जात नाही. नेत्रदानाकरीता भरावयाचे नेत्रदान संकल्प पत्र नेत्र विभागात विनामूल्य उपलब्ध आहेत. आधिक माहितीसाठी नेत्रशल्यचिकीत्साशास्त्र विभागाशी संपर्क साधावा.
शरीरकी अंधता नही मनकी अंधता बडा मर्ज है..
उजाला लाने के लिए नेत्रदान हम सब का फर्ज है..
चिता में जायेगी राख बन जायेगी.. कब्र में जायेगी मिट्टी बन जायेगी..
नेत्रोंका कर दो दान.. किसी की जिंदगी गुलजार बन जायेगी..
डॉ. सतीश शितोळे, नेत्रतज्ज्ञ, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे: लोकशिक्षणाद्वारे लोकांना बुबुळाच्या आजाराची माहिती देऊन बुबुळाचे आजार अथवा त्यामुळे येणारे अंधत्व नेत्ररोपणाने बरे करता येते हे नागरिकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्याचा सहभाग घेत आहोत. अंधजनांना दृष्टीच्या माध्यमातून प्रकाशमय जीवन प्राप्त करून देण्यासाठी फक्त नेत्रदानाची प्रतिज्ञा न करता मृत्यूपश्चात नेत्रदान करणे आवश्यक आहे व नातेवाईकांनीही ते कृतीत आणणे आवश्यक आहे.
संकलन: जिल्हा माहिती कार्यालय, पुणे