Home ताज्या बातम्या नैसर्गिक परिसंस्थांचे पुनर्स्थापन आवश्यक

नैसर्गिक परिसंस्थांचे पुनर्स्थापन आवश्यक

0
नैसर्गिक परिसंस्थांचे पुनर्स्थापन आवश्यक

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

गेल्या आठवडाभरात कोकणापासून घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीने जागतिक हवामान बदल, नदीपात्रांमधील बांधकामे, गाळ, दरड कोसळणे, डोंगर उतारांवरील कमी झालेली वृक्षराजी अशा अनेक मुद्द्यांकडे पुन्हा लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांनीही डोंगरउतारावरील वस्त्यांचे स्थलांतर, नद्यांच्या पूरस्थितीवर मात करण्यासाठी जल आराखडा तयार केला जाईल, असे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक परिसंस्था नव्याने प्रस्थापित करण्याचे आवाहन तज्ज्ञ करत आहेत.

पर्यावरणतज्ज्ञ आणि ‘समुचित एन्वायरो टेक’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांनी, ‘महाराष्ट्रात नेहमीपेक्षा खूप जास्त पाऊस पडल्याने जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती अजिबात अनपेक्षित नाही,’ असे प्रतिपादन केले. जागतिक तापमानवाढीमुळे अरबी समुद्रात चक्रीवादळे वाढणार, कमी काळात जास्त पाऊस पडणार, विजा पडण्याचे प्रमाण वाढणार इत्यादी परिणाम होणार असल्याचे इशारे किमान दशकभरापासून संशोधक देत आले आहेत. महाराष्ट्र सरकारनेच संमत केलेल्या अहवालांमध्येही याशक्यता नोंदलेल्या आहेत. असे असूनही नगरनियोजन, धरणांचे व्यवस्थापन यामध्ये या शक्यता विचारात का घेतल्या जात नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यापुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी भूगर्भशास्त्रज्ञांच्या मदतीने दरडी कोसळण्याच्या शक्यता असलेल्या जागा शोधून वस्त्यांचे स्थलांतर करायला हवेच, पण त्याबरोबर नैसर्गिक परिसंस्था नव्याने प्रस्थापित करून भू्स्खलन थांबवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, असेही त्या म्हणाल्या.

पर्यावरणतज्ज्ञ अविनाश कुबल म्हणाले, ‘बदलत्या परिस्थितीनुसार हवामान बदलाचा आढावा घेऊन नद्यांच्या जलस्राव क्षेत्राचा अभ्यास गरजेचा आहे. येत्या काळात पाऊस अधिक अनियमित होण्याची शक्यता आहे. ढगफुटीच्या घटना होतील. त्या वेळी पाण्याचा निचरा होणे गरजेचे आहे. अशा घटना घडल्या तर कोणत्या क्षेत्राला धोका निर्माण होऊ शकेल याचाही वेध घ्यायला हवा. गेल्या चार ते पाच दशकांमध्ये नदीपात्रे उथळ झाली आहेत. जंगले नष्ट होत असल्याने माती जमिनीला धरून राहत नाही. यासाठी झाडे लावून पुन्हा जंगल फुलवले पाहिजे,’ असे कुबल यांनी स्पष्ट केले.

‘धडाडीने निर्णय घ्यावे लागतील’

‘शहरांचा विस्तार वाढवण्याऐवजी कमी करायला हवा आहे. चक्रीवादळांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम किनारपट्टीजवळील वृक्षशेतीही (आंबे, नारळ, सुपारी, इ.) कदाचित आता थांबवावी लागेल. मोठे बदल असले, तरी ते करण्यासाठी धडाडीने निर्णय घ्यावे लागतील. हे केले नाही तर दर वर्षी अधिकाधिक नुकसान आणि जीवितहानी होत जाणार आहे,’ याकडे पर्यावरणतज्ज्ञ डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांनी लक्ष वेधले आहे.

Source link