मुंबई: सखोल अभिनयासाठी आणि समाजकार्यासाठी ओळखले जाणारे अभिनेते
मकरंद अनासपुरे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘
काळोखाच्या पारंब्या’ या सिनेमाला एका मागोमाग एक आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळत आहेत. अत्यंत प्रतिष्ठेच्या न्यूयॉर्क येथील ब्रूकलीन चित्रपट महोत्सवात सिनेमॅटोग्राफर सुरेश देशमाने यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा बहुमान प्राप्त झाला आहे. अमेरिकेत हा २४वा ब्रूकलीन चित्रपट महोत्सव ४ ते १३ जून या कालावधीत विंड मील स्टुडिओ येथे पार पडला.
मकरंद अनासपुरे दिग्दर्शित ‘काळोखाच्या पारंब्या’ या एकमेव भारतीय चित्रपटाला या महोत्सवात मानांकन मिळालं होतं. जगातील ९३ देशातील अडीच हजार चित्रपटांमधून या चित्रपटाची निवड ‘नरेटिव्ह फिचर फिल्म’ या विभागात निवड करण्यात आली होती. सिनेमॅटोग्राफीसाठी या चित्रपटाला मानांकन मिळालं होतं. अंतिम फेरीतील ८ हॉलिवूड आणि ४ ब्राझीलच्या सिनेमांच्या स्पर्धेत सिनेमॅटोग्राफर सुरेश देशमाने यांना ज्युरींनी कौल दिला. यापूर्वी ‘मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्येही सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. भारतीय सिनेसृष्टीत सातत्यानं नवनवे प्रयोग करणारा सृजनशील सिनेमॅटोग्राफर म्हणून देशमाने यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. टेक्सासमधील अतिशय मानाच्या ‘५४ व्या वर्ल्ड फेस्ट ह्युस्टन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्येही ‘काळोखाच्या पारंब्या’ला प्रतिष्ठेचा गोल्ड रेमी अॅवॉर्ड प्राप्त झाला आहे. प्रख्यात कथालेखक भारत सासणे यांच्या ‘डफ’ या दीर्घकथेवर हा चित्रपट आधारित आहे.
तंत्राच्या सृजनाला ही दाद
आंतरराष्ट्रीय स्तरावर सिनेमाचं तंत्र अत्यंत प्रगत आहे. त्यांचं बजेटही मोठं असते. अत्यंत तुटपूंज्या साहित्यासह तशा प्रतिकूल स्थितीत काम करताना कल्पकतेने मन लावून काम केलं तर त्या त्रुटींवर मात करता येते, हे या चित्रपटासाठी मिळालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पुरस्कारांनी सिद्ध केलं आहे.
– सुरेश देशमाने, ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर
मराठी साहित्याची ताकद
ब्रूकलीन फिल्म फेस्टिव्हलमध्ये दखलपात्र ठरणं ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. सुरेश देशमाने अव्वल दर्जाचे सिनेमोटोग्राफर आहेत. त्यांनी केलेल्या मेहनतीला अशी दाद मिळालेली पाहून अतिशय आनंद होतोय. महत्त्वाचं म्हणजे मराठी साहित्याची ताकद यातून सिद्ध होते. मराठीतील सशक्त कथा-कादंबऱ्यांचे सिनेमात रूपांतर केले तर जागतिक पातळीवर त्याची नोंद घेतली जातेय.
– मकरंद अनासपुरे, ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक
Source link