मंगळवार, २० जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी असून चार्तुमासारंभ देखील होत आहे. वारीनिमित्त चंद्रभागेच्या तिरी दरवर्षी भक्तिसागर उसळतो. करोना तिसरी लाट लक्षात घेता वारीसाठी येणाऱ्या पालख्या, दिंड्यांना पंढरपूरमध्ये येण्यास सरकारने बंदी घातली आहे. वारकरी, भाविक चोरट्या मार्गाने प्रवेश करण्याची शक्यता आहे, असे नमूद करत आदेश काढण्यात आले.
१७ जुलै दुपारी २ ते २५ जुलै सायंकाळी ४ पर्यंत सर्व जिल्ह्यातील एसटी सेवा पंढरपूर येथे येण्यास मनाई करण्यात आली आहे. आंतरराज्य -आंतरजिल्हा नाकाबंदी, पंढरपूर तालुका सीमा नाकाबंदी व शहरात नाकाबंदी आहे. या काळात राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांनी एकही एसटी पंढरपूरसाठी रवाना करू नये. तसेच पंढरपूर येथून आरक्षणासाठी उपलब्ध केलेल्या सर्व फेऱ्या तातडीने बंद कराव्या, असे आदेश सोलापूरच्या विभाग नियंत्रकाने दिले आहेत.
अर्थचक्रही थांबणार
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला वारीच्या काळात साडे चार ते पाच कोटींचे उत्पन्न मिळते. एसटी महामंडळाला वारीमुळे २२ ते २३ कोटी आणि रेल्वे विभागाला १ ते २ कोटी उत्पन्न मिळते. वारीनिमित्त तुळशी माळा, बुक्का, हळद, कुंकू, मुर्ती, प्रसाद यांच्या विक्रीमुळे स्थानिकांना रोजगार मिळतो. वारीनंतर साधारण ४० ते ५० टक्के घरपट्टी स्थानिक प्रशासनाला मिळते. मात्र यंदा वारीवर बंदी घातल्याने संपूर्ण अर्थचक्रच थांबणार आहे, अशी भीती व्यक्त होत आहे.