सोलापूर : गाळपासाठी ऊस जाऊन 10 महिने झाले तरी एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळाला नाही. आर्थिक विवंचनेमुळे दिवाळी सण साजरा करता आला नाही. म्हणून उद्विग्न झालेल्या शेतकऱ्यांनी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी आणि सीताराम साखर कारखान्याच्या विरोधात पंढरपूर तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा 5 वा दिवस असून या शेतकऱ्यांची दिवाळी उपाशी पोटी तहसीलदारांच्या दारात जात आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांना ठोस असे काहीही मिळलेले नाही. मात्र उपोषणाचा 5 वा दिवस असल्याने आंदोलकांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे आंदोलकांचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले आहे.
दिवाळी सण तोंडावर आल्यामुळे सणासाठी तरी पैसे मिळावेत म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. तरीही साखर कारखान्याच्या प्रशासनाने दखल घेतली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसभेनंतर कारखान्याला कर्ज मंजूर करणार आहेत असे म्हणून कल्याणराव काळे यांनी फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी करत आहे. आमची बिल मिळाली नाहीत तर कल्याणराव काळे यांच्या घरासमोर फास घेणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.