पतंजली बंद करा…!; रामदेव बाबांवर खवळले नेटकरी

- Advertisement -

योगगुरु रामदेव बाबा यांनी टीव्हीवरील एका मुलाखतीत पेरियार, आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांबाबत वादग्रस्त विधान केल्याने मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. रामदेव बाबा यांची कंपनी पतंजलीविरोधात सोशल मीडियावर धुमाकूळ सुरु असून पतंजलीच्या उत्पादनांवर बंदी घालण्याचे आवाहन करणारे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहेत.

रामदेव बाबा यांच्या वादग्रस्त मुलाखतीनंतर शनिवारी सोशल मीडियावर #BycottPatanjaliProducts हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होता. त्यानंतर रविवारी सकाळपासून #ShutdownPatanjali हा हॅशटॅग ट्रेटिंगमध्ये आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत रामदेव बाबा म्हणाले होते, “ईश्वर मानणारे मूर्ख असतात असे म्हणणारे पेरियार यांचे अनुयायी वाढत आहेत. मला बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारही पटतात पण त्यांच्या अनुयायांमध्ये देखील मूलनिवासी ही संकल्पना राबवणारे लोक आहेत. मी दलितांमध्ये भेदभाव करीत नाही. मात्र, वैचारिक दहशतवादाविरोधात देशात कायदा व्हायला हवा, अशा प्रकारचे लिखाण सोशल मीडियातून हटवायला हवे.”

रामदेव बाबा यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. हंसराज वीणा या युजरने रामदेव बाबा यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटले, प्रिय रामदेव, तुम्ही अजून माफी मागितली नाहीत. आपलं एवढं धाडस? हे धाडस येत कुठून? सत्ता आणि सत्ताधाऱ्यांमुळेच ना?. पेरियार, आंबेडकर, मूलनिवासी अस्मिता यांवर वादग्रस्त टिपण्णी करणे तसेच आम्हाला वैचारिक दहशतवाद म्हणणे आम्ही सहन करणार नाही.

दिलीप मंडल यांनी ट्विटरवर लिहीले, हा आपल्या महापुरुषांच्या सन्मानाचा प्रश्न आहे. हे प्रॉडक्टच खराब आहे. कमेंटसह रिट्विट करा. सविता आनंद नावाच्या युजरने लिहिले, रामदेव बाबा आता तुमच्या दुकानाचाही वैचारिक बहिष्कार झाला आहे. त्यामुळे आता उलटी गिनती सुरु करा.

डॉ. कौशल कंवर यांनी लिहिले, माझा सल्ला आहे की रामदेव बाबा यांनी आता गुडघ्यावर बसून माफी मागायला हवी. अन्यथा पुन्हा रामलीलाप्रमाणे त्यांना पळून जावे लागेल. नितीन मेश्राम यांनी लिहिले, रामदेव बाबांनी त्यांच्या पतंजलीसाठी सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी फसवून खरेदी केल्या आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना माझे आवाहन आहे की त्यांनी आपल्या जमिनी पुन्हा मिळवण्यासाठी मोठे आंदोलन सुरु करावे.

- Advertisement -