Home ताज्या बातम्या पतीच्या अपघातानंतर महिला चालवते रिक्षा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

पतीच्या अपघातानंतर महिला चालवते रिक्षा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

जेव्हा कुटुंबाच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी नेहमी पदराआड असणारी गृहिणी डोक्यावरील पदर कमरेला खोचून परिस्थितीशी दोन हात करते तेव्हा प्रारब्ध आणि नशिबाच्या रेषा आपल्या मनाप्रमाणे आखत असते. अशाच झुंजार रणरागिणीची ही कहाणी आहे. पतीच्या टेम्पोला अपघात झाला. अपघातमध्ये पतीच्या पायाला दुखापत होऊन पायात रॉड टाकायला लागला. मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, जन्माचे अपंगत्व आले. हालचालीवर मर्यादा आल्या. त्यामुळे पूर्वीसारखं काम जमेना. अशा परिस्थित कुटुंबाची उपासमार होण्याची वेळ आली.


सरिता गाडे यांनी परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. हहडपसर, मांजरी, पंधरा नंबर, महादेवनगर व इतर परिसरात सध्या रिक्षा चालवत आहेत.त्या बोलताना पुढे म्हणाल्या वाढती महागाई, बेरोजगारी, दुष्काळ या समस्येला अनेक नागरीकांना सामोरे जावे लागत आहे. त्यातून खचून जावून अनेकण आत्महत्या करतात. माझे पती बाळु गाडे हे देखील रिक्षा चालवत होते. कुटुंबाला मदत करण्यासाठी मी देखील त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून कुटुंबाचा गाडा ओढते.

सरिता गाडे सध्या भाड्याने परमिट लायसन्स घेऊन सध्या रिक्षा चालवत आहेत. ते म्हणाले माझे परमिट लायसन्स काढायचे आहे परंतु कागदपत्रांमध्ये त्रुटी निघत असल्याने माझे परमिट लायसन्स निघत नाही. त्यामुळे दुसऱ्याचे परमिट लायसन्स वापरत आहेत. त्यामुळे ज्या मालकाच्या नावे लायसन्स आहे त्यांना दिवसाला दोनशे पन्नास रुपये भाडे स्वरूपात पैसे द्यावे लागतात. त्यामुळे स्वत: चे परमिट लायसन्स निघाल्यास हे पैसे द्यावे लागणार नाही. शासनाने महीलांना परमिट लायसन्स काढण्यासाठी सवलत दिली पाहिजे अशी गाडे यांनी मागणी केली आहे.

सुरवातीला रिक्षा चालवना थोडे अवघड वाटत होते पतींनीच रिक्षा चालवायला शिकवले परंतु सध्या काही वाटत नाही. उलट प्रवाशांना महिला रिक्षा चालवत असल्याचे कुतूहल वाटत आहे. प्रवाशी रिक्षात बसल्यावर माझी विचारपूस करतात. पंरतु कुटुंबाला हातभार लावत असल्याने समाधान वाटते. अनेक महाविद्यालयीन मुली माझ्यासोबत आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी काढतात. यातून प्रवाशांमधील असणारी आपुलकी दिसून येत.

बाळू गाडे (महिला रिक्षाचालकाचे पती) : १९९२ साली उदरनिर्वाह करण्यासाठी पुण्यात आलो. व उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात २०१४ साली अपघात झाला. त्यात पायाला मोठी दुखापत झाली. पाय काम करत नाही. त्याचबरोबर कंबरेचा मनक्याचा आजार असल्याने रिक्षा चालवताना त्रास होतो. पत्नीनेच स्वत: रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. स्वत: म्हणाली कुटुंब चालवण्यासाठी माझा हातभार लागेल. त्यामुळे तिने रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला तिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.