एक मे रोजी हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे नातेवाईक आहेत. फिर्यादीची पत्नी आणि आरोपी निर्मला या सख्या बहिणी आहेत. हे सर्वजण मार्केटयार्ड परिसरातील एका बांधकाम साईटवर काम करतात. तेथीलच लेबर कॅम्पमध्ये राहतात. आरोपीला तिच्या बहिणीचे आपल्या पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे आरोपीचा बहिणीवर राग होता. फिर्यादीचा मुलगा चाकेन हा बांधकाम साईटच्या परिसरात खेळत होता. त्यावेळी आरोपीने त्याला उचलून घेतले आणि साइटच्या तळमजल्याच्या लिफ्टजवळील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात फेकून दिले. यात त्याचा बुडून मृत्यू झाला.
असा लागला गुन्ह्याचा छडा
या मृत्यू प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, चौकशीदरम्यान पोलिसांनी बांधकाम साइट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यात आरोपी निर्मला मुलाला घेऊन जात असताना दिसून आली, तर थोड्यावेळाने परत येताना ती एकटीच आल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी निर्मलाकडे चौकशी केली असता, तिनेच मुलाला पाण्यात फेकून दिल्याचे कबुली दिली. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे, अशी माहिती मार्केटयार्ड पोलिसांनी दिली.