
- राज्यात ब्रॉड स्पेशालिटीच्या ७ हजार ६१५ जागा
मुंबई, दि. ६ : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियोजनबद्ध प्रयत्नांतून राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या संधी विस्तारल्या असून, महाराष्ट्राने राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढून राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळण्यासह नागरिकांना विशेष उपचार सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध होणार आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये महाराष्ट्रात पदव्युत्तर ब्रॉड स्पेशालिटी अभ्यासक्रमांच्या एकूण ७ हजार ६१५ जागा उपलब्ध झाल्या असून, देशातील आघाडीच्या दहा राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने दुसरे स्थान मिळविले आहे. गतवर्षीच्या ६ हजार ५४९ जागांच्या तुलनेत यंदा १ हजार ६६ जागांची म्हणजेच १६.३ टक्क्यांची निव्वळ वाढ झाली आहे. अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
| आजची वाढलेली पदव्युत्तर प्रवेशक्षमता ही उद्याच्या सक्षम आरोग्यव्यवस्थेचा पाया आहे. महाराष्ट्रात अधिक तज्ज्ञ डॉक्टर घडतील, वैद्यकीय संशोधनाला चालना मिळेल आणि शासकीय रुग्णालयांची उपचारक्षमता वाढेल. वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेला प्रत्यक्ष बळ देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. |
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) ६ नोव्हेंबर २०२६ रोजी अद्ययावत केलेल्या आसन मॅट्रिक्सनुसार, कर्नाटक राज्य ८ हजार ८६२ जागांसह देशात प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रानंतर तमिळनाडू ६ हजार ६७८, उत्तर प्रदेश ६ हजार ६७५, तेलंगणा ४ हजार ४०३ आणि आंध्र प्रदेश ४ हजार ३०९ जागांसह पुढील क्रमांकावर आहेत. राजस्थानमध्ये ३ हजार ९५०, गुजरातमध्ये ३ हजार ८०१, मध्य प्रदेशात ३ हजार २७७, तर पश्चिम बंगालमध्ये २ हजार ३५४ जागा आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ७२० जागांची निव्वळ वाढ
राज्यातील २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील एम.डी. आणि एम.एस. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये २९ सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत एकूण ७२० जागांची निव्वळ वाढ झाली आहे. या वाढीमुळे राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाची प्रवेशक्षमता विस्तारली आहे.
महाविद्यालयनिहाय आकडेवारीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उस्मानाबाद येथे सर्वाधिक ७७ जागांची वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ औरंगाबाद येथे ७३, सातारा येथे ६४, धुळे येथे ४४ आणि अंबरनाथ येथे ४० जागांची वाढ नोंदविण्यात आली आहे. कोल्हापूर आणि अंबाजोगाई येथे प्रत्येकी ३९, लातूर येथे ३८, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे ३७, तर सोलापूर आणि जालना येथे प्रत्येकी ३५ जागांची निव्वळ वाढ झाली आहे.
याशिवाय हिंगोली येथे ३२, एल. टी. मार्ग, मुंबई येथे ३०, अलिबाग येथे २७, बारामती येथे २२ आणि नांदेड येथे १९ जागांची वाढ झाली आहे. बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर आणि यवतमाळ येथे प्रत्येकी १७ जागांची वाढ झाली आहे. नंदुरबार येथे सात, गोंदिया येथे सहा, नाशिक येथे तीन आणि चंद्रपूर येथे दोन जागांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
विविध वैद्यकीय शाखांमध्येही पदव्युत्तर प्रवेशक्षमता वाढली आहे. यामध्ये भूलशास्त्र, शरीररचनाशास्त्र, जैवरसायनशास्त्र, समुदाय वैद्यक, न्यायवैद्यकशास्त्र, सर्वसाधारण औषधशास्त्र, बालरोगशास्त्र, विकृतिशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र, मानसोपचारशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, रेडिओडायग्नोसिस, सर्वसाधारण शल्यचिकित्सा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, नेत्ररोगशास्त्र आणि अस्थिरोगशास्त्र आदी शाखांचा समावेश आहे.
औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शरीरक्रियाशास्त्राच्या जागा तीनवरून २१, तर जैवरसायनशास्त्राच्या जागा दोनवरून १७ झाल्या आहेत. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे विकृतिशास्त्राच्या जागा चारवरून १५, औरंगाबाद येथे समुदाय वैद्यकाच्या जागा १२ वरून २२, तर कोल्हापूर येथे भूलशास्त्राच्या जागा चारवरून १४ झाल्या आहेत.
राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशक्षमतेत झालेली ही वाढ वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरत आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची क्षमता बळकट करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
000000
अश्विनी पुजारी/विसंअ

WhatsApp