Home शहरे मुंबई पद वाचविण्यासाठी ‘तिने’ उभी केली ‘माझ्या नवऱ्याची बायको’, एक लाख रुपयांचा दंड

पद वाचविण्यासाठी ‘तिने’ उभी केली ‘माझ्या नवऱ्याची बायको’, एक लाख रुपयांचा दंड

मुंबई :  दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याने अपात्र ठरून आपले पद जाऊ नये यासाठी जालना जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीच्या महिला सदस्याने उभी केली माझ्या नवऱ्याची बायको व आपला मुलगा प्रत्यक्षात तिचा असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. पण तिची ही लबाडी उघड झाल्यानंतर उच्च न्यायालयाने या महिलेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

कायद्यानुसार १३ सप्टेंबर २००० नंतर दोनहून अधिक अपत्ये होणाऱ्या व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतात. सुरेखा मुकुंद दाभाडे यांना अनिकेत हा चौथा मुलगा झाल्याच्या कारणावरून अपात्र घोषित केले गेले होते. मात्र त्यातून वाचण्यासाठी त्यांनी असा बनाव रचला की अनिकेत हा आपल्या पतीला त्यांच्या दीपाली या दुसऱ्या बायकोपासून झालेला मुलगा आहे. अनिकेत दीड वर्षाचा असताना दीपाली घरातून निघून गेली व तिचा अद्याप पत्ता लागलेला नाही. औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश न्या. रवींद्र घुगे यांना हे सर्व प्रकरण संशयास्पद वाटले.

आपला बनाव न्यायाधीशांच्या गळी उतरत नाही, हे पाहिल्यावर सुरेखा यांनी याचिका मागे घेऊ देण्याची विनंती केली. मात्र, न्या. घुगे यांनी त्यास ठाम नकार देत उलट सुरेखा व त्यांच्या पतीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्याचे संकेत दिले. मात्र, दाभाडे दाम्पत्याने लबाडी कबूल करून गयावाया केल्यावर गुन्हा नोंदवत एक लाख दंडाचा आदेश दिला गेला. दंडापैकी प्रत्येकी ५० हजार रुपये औरंगाबाद यथील कर्करोग रुग्णालयास व घाटी रुग्णालयास गरीब रुग्णांच्या उपचारांसाठी द्यायचे आहेत.

या दाम्पत्यास अशी अपात्रता लागू असणारी निवडणूक आयुष्यात पुन्हा लढविता येणार नाही, असेही न्यायालयाने जाहीर केले.