Home शहरे अमरावती परतवाड्यात ५० लाखांचे फर्निचर जळून खाक

परतवाड्यात ५० लाखांचे फर्निचर जळून खाक

0

२६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ च्या सुमारास लागलेल्या आगीत टिपटॉप फर्निचर, अदनान फर्निचर, गुलामे गाजी फर्निचर, सादीरभाई, अबू तालीम, शेख अयूब, मुन्ना हमीद फर्निचर या दुकानांतील साहित्याचा कोळसा झाला. घटनेची माहिती मिळताच अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव, परतवाडाचे पोलीस निरीक्षक सदानंद मानकर, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्यासह प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.

परतवाडा : स्थानिक लाकूड बाजाराला लागलेल्या भीषण आगीत फर्निचरची आठ दुकाने जळून खाक झाली. यात यंत्रसामग्रीसह महागडे फर्निचर जळाल्याने ५० लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
२६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ च्या सुमारास लागलेल्या आगीत टिपटॉप फर्निचर, अदनान फर्निचर, गुलामे गाजी फर्निचर, सादीरभाई, अबू तालीम, शेख अयूब, मुन्ना हमीद फर्निचर या दुकानांतील साहित्याचा कोळसा झाला. घटनेची माहिती मिळताच अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव, परतवाडाचे पोलीस निरीक्षक सदानंद मानकर, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्यासह प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. हाकेच्या अंतरावरील अचलपूर नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे वाहन नेहमीप्रमाणे घटनास्थळी उशिरा पोहोचले. त्यातही वाहन क्रमांक एमजीएस १०८२ हे नादुरुस्त असल्याचे निदर्शनास येताच घटनास्थळावरून परत न्यावे लागले. अवघा लाकूडबाजार आगीने कवेत घेतल्याने अनर्थ टाळण्याच्या उद्देशाने अमरावती महापालिकेसह चिखलदरा, अंजनगाव, चांदूर बाजार, दर्यापूर येथील अग्निशमन वाहन एकामागून एक दाखल झाले. अखेर तीन तासांनी या सर्वांच्या परिश्रमाने आग नियंत्रणात आली. आगीचे उग्र रूप बघून काही दुकानदारांनी आपापल्या दुकानातील लाकूड व तयार फर्निचर तितक्याच रात्री रस्त्यावर काढण्याचा प्रयत्न केला. ही आग नेमकी कशाने लागली, याची माहिती अद्याप कळू शकली नाही.
वारंवार आगी लागत असल्या तरी दुकानदारांनी दुकानांचा विमा काढलेला नसल्याने आताच्या नुकसानाची भरपाई कोण देणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वारंवार आगीच्या घटना
लाकूडबाजाराला यापूर्वी सन १९९७, २००१, २००२, २०१६, २०१७ मध्ये आग लागली. यापैकी सन २०१७ मध्ये लागलेल्या आगीत फारच मोठे नुकसान झाले होते. यापुढे आगीची घटना टाळण्याच्या दृष्टीने शासनाने उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.