Home बातम्या महत्वाच्या बातम्या परदेशी गुंतवणूकदार ‘लक्ष्य’ नाहीत, अर्थमंत्रालयाने दिले स्पष्टीकरण

परदेशी गुंतवणूकदार ‘लक्ष्य’ नाहीत, अर्थमंत्रालयाने दिले स्पष्टीकरण

कंपनी म्हणून गुंतवणूक केल्यास लागणार कमी कर

नवी दिल्ली : अर्थसंकल्पात अतिश्रीमंतावरील करात वाढ करण्यात आलेली आहे. त्याच दराने परदेशी गुंतवणूकदारांनाही कर द्यावा लागतो. त्यामुळे अर्थसंकल्पात परदेशी गुंतवणूकदारांना लक्ष्य करण्यात आले आहे, अशी टीका केली जाऊ लागली आहे. हे गुंतवणूकदार शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेत असल्यामुळे गेल्या तीन दिवसात शेअर बाजाराचे निर्देशांक बरेच कमी झाले आहेत.

अर्थमंत्रालयाने आता यावर एक स्पष्टीकरण केलेले आहे. एक व्यक्ती म्हणून किंवा व्यक्तींचा समूह म्हणून या गुंतवणूकदारानी गुंतवणूक केल्यास भारतीय कायद्याप्रमाणे त्यांना अतिश्रीमंतांना जो कर द्यावा लागतो तो कर द्यावा लागेल. मात्र, हा दर कंपन्यांना लावलेला नाही. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी कंपनी निर्माण करून गुंतवणूक केल्यास त्यांना या दराने कर द्यावा लागणार नाही असे स्पष्टीकरण अर्थमंत्रालयाने केले आहे.

भारताला केवळ शेअरबाजार आणि रोखे बाजारातच परकीय गुंतवणूक हवी आहे, असे नाही तर उद्योग क्षेत्रातही थेट परकीय गुंतवणूक हवी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सरकारकडून भेदभाव होण्याचा प्रश्‍नच नाही.