ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना परमबीर सिंग यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बिल्डरांच्या एका भ्रष्टाचार प्रकरणातील अनेक आरोपींची नावे वगळण्यासाठी त्यांनी माझ्यावर प्रचंड दबाव आणला. मी त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे त्यांनी कट रचून मला लक्ष्य केले आणि माझ्याविरोधात पाच धादांत खोटे एफआयआर नोंदवायला लावले, असे निदर्शनास आणत घाडगे यांनी भारतीय दंड संहिता व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे अटकेच्या भीतीने परमबीर यांनी याचिका करून एफआयआर रद्द करण्याची किंवा प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची विनंती केली आहे. यावर याप्रकरणी परमबीर यांच्याविरुद्ध ९ जूनपर्यंत वा पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत अटकेची कारवाई होणार नाही, अशी सशर्त हमी राज्य सरकारने दिली होती.
अनेकांकडून आरोप
निरीक्षक घाडगे यांच्यासह निरीक्षक अनुप डांगे, बुकी सोनू जालान याच्यासह विरारच्या एका बिल्डरनेही परमबीर यांच्यावर पैसे घेल्याचे आरोप केले आहेत. ही प्रकरणे लाचलुचतविरोधी पथक तसेच, सीआयडीकडे तपासकरिता देण्यात आली आहेत. याचबरोबर कार डिझायनर आणि डीसी अवंती कारचे मालक दिलीप छाब्रिया यांनीदेखील मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच पोलिस महासंचालकांना पत्र लिहून परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरूनच वाझेंकडून खंडणीवसुली सुरू होती असा आरोप केला आहे. २५ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी सिंग यांच्या सांगण्यावरून वाझे माझा आणि कुटुंबाचा छळ करीत होता असा आरोपही त्यांनी केला आहे. छाब्रिया यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी अद्याप तपास सुरू झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.