परळी वैजनाथ येथे पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन

- Advertisement -


बीड, दि. १५ – परळी वैजनाथ येथे ६३४ कोटी रुपये खर्चाच्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचा कोनशिला समारंभ आणि भूमिपूजन सोहळा राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे पशुवैद्यकीय शिक्षण मिळण्यासोबतच स्थानिक शेतकऱ्यांच्या समृद्धीला नवीन दिशा मिळणार आहे.

पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार  नमिता मुंदडा, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान, पोलीस अधिक्षक नवनीत कावत, आदी यावेळी उपस्थित होते.

आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, महाराष्ट्र हा कष्टकऱ्यांचा आणि मराठवाडा ही कष्टाची खाण आहे. शेतीला मुख्य आधार देणाऱ्या पशुधनाची काळजी घेणे ही काळाची गरज बनली आहे. या क्षेत्रात उच्च शिक्षणासाठी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे नवे महाविद्यालय उपलब्ध होणार आहे. या महाविद्यालयामुळे  अत्याधुनिक शिक्षण आणि सुविधा उपलब्ध होतील. ज्याचा लगतच्या जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांनाही लाभ होणार आहे.

६३४ कोटी रुपयांची भरघोस तरतूद, सुसज्ज इमारत, वसतिगृह अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र. आजूबाजूच्या ५० ते १०० गावांतील जनावरांवर आधुनिक उपचार परळीतच होतील. दूध उत्पादन वाढवणे आणि फायदेशीर शेळीपालनावर संशोधन केले जाईल.

या महाविद्यालयातून केवळ नोकरी मागणारे डॉक्टर नव्हे, तर पेट केअर क्लिनीक, डेअरी सल्लागार आणि पशुखाद्य निर्मिती क्षेत्रात नोकरी देणारे तरुण उद्योजक तयार व्हावेत, अशी अपेक्षा  उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी यावेळी आपल्या भाषणात व्यक्त केली. तसेच चालू शैक्षणिक वर्षातच येथील प्रवेश सुरू केले जातील असेही त्या म्हणाल्या.

या महाविद्यालयाचे काम अत्यंत दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले असून तसेच “समृद्ध शेतकरी, सुदृढ जनावर आणि स्वावलंबी मराठवाडा” घडवण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी यावेळी सांगितले.

या पशुवैद्यक महाविद्यालयाच्या माध्यमातून परळी परिसरात मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत असे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. पशुपालकांना त्यांच्या व्यवसायाच्या मदतीसाठी 50 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.



Source link

- Advertisement -