: महापालिकेच्या भांडुप पंपिग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने रविवारी जवळपास संपूर्ण मुंबईतील पाणीपुरवठा खंडित झाला. पंपिग स्टेशनमध्ये नवीन ९०० दशलक्ष लिटरचा प्लांट बसवताना परिसरात कमी क्षमतेच्या पर्जन्यजलवाहिन्या टाकण्यात आल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे सांगितले जात आहे. यंदा अधिक पाऊस पडला आणि पाणी थेट गाळणी (फिल्टरेशन) आणि पंपिग विभागात शिरले. त्यामुळे मुंबईकरांना तब्बल १८ तासांहून अधिक वेळ ‘निर्जळी’ला सामोरे जावे लागले. दरम्यान, संकुल परिसरात साचलेले पाणी विहार तलावात न गेल्याने संकुलात शिरल्याचा दावा भाजपने केला आहे.
शनिवारी रात्री पडलेल्या बेफाम पावसामुळे भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात पाणी शिरल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी (फिल्टरेशन) आणि पंपिग यंत्रणा बंद पडली. त्यामुळे पालिकेने खबरदारी म्हणून संकुलातील विद्युत पुरवठा यंत्रणा बंद केली. या कारणाने पूर्व उपनगरातील काही भाग वगळता शहर आणि पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला होता. मुंबईला सात धरणांतून दररोज सुमारे ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. धरणांतून येणाऱ्या सुमारे २१०० दशलक्ष लिटर पाण्यावर भांडुप संकुलात शुद्धीकरण प्रक्रिया करून ते मुंबईतील विभागीय जलाशयांमध्ये पाठवले जाते. तिथून पाणी घरोघरी पोहोचते. त्यामुळे भांडुप संकुलाचे महत्त्व पालिकेच्या लेखी मोठे आहे.
भांडुप संकुल परिसर उंचावर असून परिसरापासून काही अंतरावर मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव आहे. हा तलाव सखल भागात असून संकुल परिसरात साचलेले पाणी तलावात जाते. मुंबई शहरात तुळशी आणि विहार हे दोन तलाव असून, हे दोन्ही तलाव इतर पाच तलावांच्या तुलनेने लहान आहेत. विहारची पाणी साठवण क्षमता ही २७,६९८ दशलक्ष लिटर इतकी असून दररोज ९० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा या तलावातून मुंबईकरांना केला जातो. रविवारी संकुलात पाणी शिरण्यामागे पर्जन्यजलवाहिन्या हे एक कारण सांगितले जाते आहे.
पालिकेने पंपिग स्टेशनमध्ये ९०० दशलक्ष लिटर पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करणारा नवीन प्लांट तीन वर्षांपूर्वी तयार केला आहे. या प्लांटदरम्यान बसवण्यात आलेल्या पर्जन्यजलवाहिन्यांची क्षमता कमी आहे. काही ठिकाणी पर्जन्यजलवाहिन्यांचे जाळे आकुंचन पावत असून पाणी जंक्शनपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे पावसाळ्यात संकुल परिसरातील पाणी वाहून नेण्यास अडथळे येत असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. सन २०१८ आणि २०१९मध्ये देखील संकुलात पाणी शिरले होते. मात्र तातडीने पाण्याचा निचरा करण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी सोमवारी संकुलाला भेट दिल्यानंतर पाणी वाहून जाण्याच्या यंत्रणेची पाहणी करून उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
पाणी वाहून जाण्यात अडथळे?
भांडुप पंपिग स्टेशनच्या गेल्या ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आतमध्ये पाणी शिरल्याने भाजपने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. २६ जुलै, २००५ रोजीच्या तुफान पावसातही येथे पाणी शिरले नव्हते. विहार तलाव ओसंडून वाहू लागला, त्याच दिवशी संकुलात पाणी शिरले. पंपिगमध्ये आलेले पाणी नैसर्गिकरीत्या तलावात का गेले नाही, पाणी वाहून जाण्याच्या स्त्रोतात काही तांत्रिक अडथळे निर्माण झाले होते का, असे असेल तर त्याची कारणे काय, भविष्यात काय उपाययोजना करता येतील, याची चौकशी करून सविस्तर अहवाल पालिका प्रशासनाने द्यावा, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
यामुळेच पाणी अडले
१. शुद्धीकरण प्रक्रिया करणाऱ्या केंद्रात बसवलेल्या पर्जन्यजलवाहिन्यांची क्षमता कमी असल्याचे कारण.
२. पंपिंग स्टेशनमधील काही ठिकाणी पर्जन्यजलवाहिन्यांचे जाळे आकुंचन पावत असल्याचे स्पष्ट.
३. जंक्शनपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने पावसाळ्यात संकुल परिसरातील पाणी वाहून नेण्यात अडथळे.