नाशिक, दि.25 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात पर्यटन संचालनालय, नाशिक कार्यालयामार्फत नाशिक येथे गंगापूर धरण बॅकवॉटर्स येथे आयोजित ग्लॅम्पिंग महोत्सवाचे उद्घाटन आज विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते झाले.
यावेळी पर्यटन संचालनालय, मुंबई चे संचालक बी. एन. पाटील, पर्यटन संचालनालय, नाशिकच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, नाशिक परिसरातील पर्यटन स्टेकहोल्डर, ट्रॅव्हल एजंटस असोसिएशन ऑफ नाशिक चे अध्यक्ष व सदस्य, भोसला मिलिटरी स्कूल चे विद्यार्थी व पर्यटन विभागाचे अधिकारी व कर्मचारी व पर्यटक उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी यावेळी येथे उभारण्यात आलेल्या टेंटची व स्टॉलची पाहणी केली.
गंगापूर धरण बॅकवॉटर्स येथे २५ जानेवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत इको ग्लॅम्पिंग महोत्सवाचे आयोजन केले आहे. जेथे पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव निर्माण करण्यासाठी लक्झरी कॅम्पिंग, सांस्कृतिक कार्यक्रम आणि साहसी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये एकूण ६० टेंट उभारण्यात आले आहेत. तसेच विविध वस्तू विक्रीसाठी बचत गट इत्यादी यांना छोटे २० स्टॉल्स टेंट उपलब्ध करून दिले आहेत. सदर महोत्सवामध्ये उभारलेले टेंट पर्यटकांना भाड्याने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पर्यटकांसाठी विविध प्रकारचे मनोरंजनात्मक व साहसी उपक्रम आयोजित केले आहेत. या उपक्रमांमध्ये Wine Experience Center, हस्तकला व खाद्य पदार्थ प्रदर्शन व विक्री, ग्रामीण जीवन शैली चे अनुभव, जमीन, हवा आणि पाणी या संबंधित साहसी उपक्रम, लोककला, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींचा समावेश आहे.
साहसी पर्यटन उपक्रमांमध्ये महोत्सवात पॅरा सेलिंग, पॅरा मोटरिंग, सायकलिंग, ट्रेकिंग, डुओ सायकलिंग, ऑल-टेरेन व्हेईकल्स (एटीव्ही) आणि पेंटबॉल अरेना यासारख्या रोमांचक ॲक्टीव्हिटीजचा समावेश आहे. सांस्कृतिक कार्यक्रम आणि फोटोग्राफी, निसर्गोपचार, बायोडायनामिक शेती, आदिवासी कला आणि संस्कृती आणि इको-मरीन एक्सप्लोरेशनवरील कार्यशाळा यांचा देखील अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे.
पर्यटकांनी नाशिक मधील लक्झरी कॅम्पिंग व विविध साहसी क्रिडा प्रकारांचा सांस्कृतिक उपक्रमांसमवेत अनुभव घेणेसाठी नक्की या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड यांनी केले आहे.