पशुसंवर्धन विभागात ४४६ पदांची भरती केली जाणार- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती – महासंवाद

पशुसंवर्धन विभागात ४४६ पदांची भरती केली जाणार- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती – महासंवाद
- Advertisement -

मुंबई, दि. २६ : पशुसंवर्धन विभागात विविध ४४६ पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबविली जात असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. पशुसंवर्धन विभागात सर्वात मोठी भरती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केली आहे.

लम्पी संसर्गाच्या वेळी पशुसंवर्धन विभागात पदांची कमतरता लक्षात घेता, त्यावेळी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लवकरच आवश्यक त्या पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन जनतेला दिले होते. त्यानुसार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत धोरणात्मक निर्णय घेत ही पशुसंवर्धन विभागाची पदभरती जाहीर केली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविली जात आहे. याच अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सरळसेवा कोटयातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. यामध्ये पशुधन पर्यवेक्षकची ३७६ पदे, वरिष्ठ लिपीकची ४४ पदे, लघुलेखक (उच्चश्रेणी)ची ०२ पदे, लघुलेखक (निम्नश्रेणी) ची १३ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञची ०४ पदे, तारतंत्रीची 03 पदे, यांत्रिकीची ०२, पदे, बाष्पक परिचरची ०२ पदे अशी एकूण ४४६ पदे भरली जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे.
२७.०५.२०२३ रोजी सकाळी १०.०० वा. पासुन अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे, तर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ११.०६.२०२३ रात्री ११. ५९ वाजेपर्यंत आहे. तसेच यांची परीक्षा येत्या जुलै महिन्यात होणार असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -