
मुंबई, दि.७ : ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात कामाठीपुरा, पश्चिम खेतवाडी परिसरात समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये कामाठीपुरा तसेच गिरगाव परिसरातील 150 हून अधिक निराधार महिला, दिव्यांग आणि इतर नागरिक यांना विविध दाखले, ज्येष्ठ नागरिक यांना ओळखपत्र व संजय गांधी निराधार योजनेसंबंधीचे सर्व लाभ एकाच ठिकाणी देण्यात आले.

या शिबिरात रिलायन्स फाउंडेशन, लोढा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला. हे शिबीर मुंबई शहरचे जिल्हाधिकारी आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली डी-वॉर्डचे नगरसेवक गौरांग झवेरी व स्नेहल तेंडुलकर, संजय गांधी योजना विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या शिबिरात विधवा महिला, दिव्यांग लाभार्थी आणि वृद्ध लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले, संजय गांधी, श्रावणबाळ योजना अर्जाच्या अनुषंगाने आवश्यक सहकार्य व कागदपत्रे पडताळणी करण्यात आली. लाभार्थ्यांचे रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्राबाबत अर्ज भरुन घेण्यात आले. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना समिती बैठकीमध्ये त्रुटी दर्शविण्यात आलेल्या प्रकरणामध्ये त्रुटींची पुर्तता करुन घेण्यात आली. लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्रबाबत मार्गदर्शन, ज्येष्ठ नागरिकांचे ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रकरीता अर्ज भरुन घेण्यात आले. निवृत्तीवेतनाच्या अनुषंगाने आधार संबधी त्रुटींची पुर्तता करून घेण्यात आली. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांच्या निवृत्तीवेतन संबधीच्या अडचणी सोडवण्यात आल्या.
०००


















WhatsApp