हायलाइट्स:
- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाल २०२१
- ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा मोठा विजय
- निवडणूक रणनीतीज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी केली संन्यासाची घोषणा
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची निवडणूक रणनीती आखण्यात प्रशांत किशोर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी आखलेल्या निवडणूक रणनीतीच्या बळावर ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये पुन्हा सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचवेळी प्रशांत किशोर यांनी एक मोठी घोषणा केली आहे. निवडणूक व्यवस्थापनाचे काम आणि आयपीएसी (IPAC) सोडत असून, काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रशांत किशोर यांनी रविवारी जाहीर केले. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये आपल्या निवडणूक व्यवस्थापनामुळे विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि डीएमके विजयी झाल्याने खूश आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये भाजप शतकी आकडा पार करणार नाही, अशी भविष्यवाणी केली होती. ती खरी होत असल्याने खूप खूश आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होण्याआधी भविष्यवाणी केली होती. भाजप १०० हून अधिक जागा जिंकल्यास मी माझे काम सोडून देईल, असे ते म्हणाले होते. रविवारी मतमोजणीनंतर त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरली आहे. भाजपला सुरुवातीचे कल बघितले तर, ८०-८५ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांनी केलेला दावा खरा ठरण्याची शक्यता असली तरी, त्यांनी हे काम सोडणार असल्याचे जाहीर केले आहे.
काय म्हणाले होते प्रशांत किशोर?
जर भाजप पश्चिम बंगालमध्ये शंभरपेक्षा जास्त जागांवर जिंकला तर, मी निवडणूक व्यवस्थापनाचे काम सोडून देईल. मी आयपीएसी सुद्धा सोडेन, असे प्रशांत किशोर यांनी जाहीर केले होते. मी वेगळे काहीतरी काम करीन पण हे काम करणार नाही, असे ते म्हणाले होते. बंगालमध्ये माझ्याकडे काहीही पर्याय नाही. दीदींनी मला माझ्या कामात, मला जसे हवे होते, तशी पूर्ण सूट दिली होती. जर बंगालमध्ये पराभूत झालो तर, मी या कामासाठी योग्य नाही, असे ते म्हणाले होते.