Home शहरे मुंबई पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील एसटी सेवा ठप्प

पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील एसटी सेवा ठप्प

0

मुंंबई : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे एसटीची सेवा पूर्णत: ठप्प झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महापूरसदृश्य स्थिती असल्यामुळे ६ हजार १९८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई विभागातून बाहेरगावी जाणाऱ्या फेऱ्याही रद्द केल्याने, एसटी महामंडळाला कोट्यवधीच्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.राज्यात एसटी महामंडळाचे एकूण ३१ विभाग आहेत. या सर्व विभागांतून एसटीला दररोज २२ कोटींचा महसूल मिळतो. मात्र, मागील काही दिवसांपासून राज्यातील १० विभागांत मोठ्या प्रमाणात आणि ६ विभागांत किरकोळ प्रमाणात जलप्रलय आल्याने, एसटी बससेवा ठप्प झाल्या आहेत.

कोल्हापूर विभागातून दररोज सरासरी ४० ते ५० लाखांचा महसूल मिळतो, तर इतर विभागातून सरासरी ३० ते ६० लाखांचा महसूल मिळतो. त्यामुळे एसटीच्या फेऱ्या कमी झाल्याने महामंडळाला एका दिवसाला अंदाजे ३ ते ७ कोटींच्या महसुलाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर-सांगलीला बेटाचे स्वरूप
मुसळधार पाऊस आणि पंचगंगेसह अन्य नद्यांना पूर आल्याने पश्चिम महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत झाले. यासह राधानगरी, वारणा, कोयना धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांना बेटांचे स्वरूप आले आहे. कोकणातील नद्या दुथडी भरून वाहत असल्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग पाण्यात बुडाले आहेत. त्यामुळे एसटी बससेवा बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला, तसेच प्रवाशांची संख्या कमी झाल्याने, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी दिल्याने, एसटीच्या फेऱ्या कमी प्रमाणात चालविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली.

कोल्हापूर आगारातील सर्व ६ हजार १९८ फेऱ्या रद्द
परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत कोल्हापूर विभागातून दररोज धावणाऱ्या ६ हजार १९८ फेऱ्यांपैकी सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर सांगली विभागातून दररोज ४ हजार ४२४ फेऱ्यांपैकी १ हजार ६०० फेऱ्या रद्द केल्या आहेत. रत्नागिरी विभागातून १ हजार ८५६ फेऱ्यांपैकी १ हजार ५६१ फेऱ्या, तर सिंधुदुर्ग विभागातून २ हजार ६०४ फेऱ्यांपैकी ६९५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मुंबई विभागातून राज्यातील विविध मार्गांवर धावणाऱ्या ९३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रायगड विभागातील अलिबाग, रोहा डेपोत पाणी साचले आहे. त्यामुळे ३ हजार ३६८ फेऱ्यांपैकी ६६५ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत.