राज्य शासनाने १ मे पासून लसीकरण पूर्ण क्षमतेने करता येणार नसल्याचे सांगितल्यानंतर रात्री उशिरा महापालिका प्रशासनाने कोविन अॅपवर नोंदणी करत ज्यांना स्लॉट मिळाले आहेत त्यांचे लसीकरण १ मे रोजी दुपारी १२ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत केले जाणार असल्याचे सांगितले. मात्र, अॅपवर नोंदणी म्हणजेच स्लॉट असा समज करून घेत नागरिकांनी पहाटे ४ वाजल्यापासून लसीकरण केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. त्यात ज्येष्ठांनीदेखील केंद्रावर मोठी गर्दी केली होती. सकाळी १०च्या सुमारास केंद्रावर आलेल्या कर्मचाऱ्यांनी रांगेत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस संपल्याचे सांगत परत पाठवले. तर उर्वरित २०० जणांना कूपन वाटले. यामुळे हे २०० जण दुपारी १२पर्यंत रांगेत होते. मात्र, प्रत्यक्षात लस घेण्याच्या वेळी या नागरिकांनी १ मे या तारखेची नोंदणीच केली नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना लस देण्यास नकार देण्यात आला. नोंदणी नसेल तर सर्टिफिकेट मिळणार नसल्याने स्लॉट बुक करूनच लस घेण्यास येण्याची विनंती नागरिकांना केली. मात्र नागरिक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या गोंधळाच्या वातावरणात या केंद्रावर तीन तासांत केवळ आठ जणांचे लसीकरण करण्यात आले. ५ वाजेपर्यंत २०० जणांना वेगवेगळी वेळ देण्यात आली असून त्यांचेच लसीकरण केले जाणार असून तितक्याच लसी शासनाकडून प्राप्त झाल्याचे आरोग्य विभागाचे लसीकरण विभाग प्रमुख डॉ संदीप निंबाळकर यांनी सांगितले.