पहिल्याच पावसात मुंबईची झाली नदी, नागरिकांनी पोहण्यासाठी मारल्या उड्या; पाहा VIDEO

पहिल्याच पावसात मुंबईची झाली नदी, नागरिकांनी पोहण्यासाठी मारल्या उड्या; पाहा VIDEO
- Advertisement -

हायलाइट्स:

  • मुंबईत आज मान्सून दाखल
  • पहिल्याच पावसात मुंबईची झाली नदी
  • नागरिकांनी पोहण्यासाठी मारल्या उड्या, पाहा VIDEO

मुंबई : मुंबईत आज मान्सून दाखल झाला आहे. पहिल्याच पावसानं मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली आहे. सकाळीच कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची धावपळ उडाली आहे. मुंबई व उपनगरासाठी २४ तास मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. पहिल्याच पावसात मुंबई कशी तुंबली याचाच एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबईत आणि उपनगरात आज सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. दादर, कुर्ला, सायन, मुलुंड, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, गोवंडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईतील दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे.

हिंदमाता जलमय

दरवर्षीच्या पावसाळ्यात हमखास पाणी साचून नागरिकांची प्रचंड गैरसोय होणाऱ्या सखल भागांपैकी एक म्हणजे हिंदमाता परिसर. या पावसातही हिंदमाता परिसरात प्रथेप्रमाणे जलमय झाला आहे. हिंदमातामध्ये तर दोन ते तीन फूट पाणी भरल्याने येथील वाहतूक कोंडी झाली आहे. अनेक वाहनांमध्ये पाणी शिरल्यानं वाहनंही बंद झाली आहेत.

नागरिकांची तारांबळ

मुंबई शहरासह उपनगरातही पावसानं धुमाकुळ घातलं आहे. दहिसर येथील चेकनाका येथे पाणी साचल्यानं प्रवाशांना या साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली आहे. अलीकडेच मुंबईतील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळं अनेक नागरिक कामासाठी बाहेर पडले आहेत. मात्र, जोरदार पावसामुळं नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. पश्चिम द्रुतगती मार्ग व पूर्व द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मुसळधार पावसामुळं दृष्यमानता कमी झाल्यानं वाहतूकीचा वेग मंदावला होता. मुंबई लोकल बंद असल्यानं नोकरदार वर्गानं रस्ते वाहतूकीचा पर्याय निवडला आहे. त्यामुळं महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

Source link

- Advertisement -