सोलापूर : परमीट रूमचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठवण्यासाठी पाच हजारांची लाच मागणाºया पोलीस कॉन्स्टेबलला व विद्युत विभाग पुणे येथून प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी, पाच हजारांची मागणी करणाºया विद्युत निरीक्षकाला एकाच दिवशी लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
तक्रारदाराने बीअर-बार परमीट रूमचा परवाना मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव बार्शी पोलीस ठाण्यातून जिल्हा विशेष शाखा पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्याकडे पाठविण्यात आला होता. प्रस्तावाचा अहवाल अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांना पाठवण्यासाठी जिल्हा विशेष शाखेतील पोलीस शिपाई युवराज महादेव कुंभार (वय-२९) यांनी ५ हजार रूपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली, त्यानुसार सोमवारी कार्यालयात सापळा रचण्यात आला.
तक्रारदार युवराज कुंभार यांची भेट घेऊन ५ हजारांची रक्कम देताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
दुसºया कारवाईत तक्रारदार याने इलेक्ट्रीक आयटीआयचा कोर्स केला आहे. त्याची नोंदणी करून परवाना मिळवण्यासठी सोलापुरातील विद्युत निरीक्षक कार्यालयात गेला होता. विद्युत निरीक्षक कार्यालयातील कनिष्ठ लिपीक कैलास दिगंबर मिसाळ (वय-४५) याने ७ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाच्या अधिकाºयाने तक्रारदारास सोमवारी कैलास मिसाळ याची भेट घेऊन तडजोडीने पाच हजार रूपये देण्यास सांगितले.
कैलास मिसाळ याने पाच हजार रूपये घेण्याची तयारी दर्शवून ती स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या कर्मचाºयांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई अॅन्टी करप्शन ब्युरो पुणेचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अपर पोलीस अधीक्षक दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अजितकुमार जाधव, पोलीस निरीक्षक कविता मुसळे, सहायक पोलीस उप-निरीक्षक निलकंठ जाधवर, महिला पोलीस नाईक अर्चना स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल निलेश शिरूर, प्रफुल्ल जानराव, शाम सुरवसे यांनी पार पाडली आहे.
लाचेची मागणी होत असल्यास संपर्क साधा..
– शहर व जिल्ह्यात कोणत्याही शासकीय कार्यालयात किंवा शासनाचे अनुदान घेणारे लोकसेवक जर कामाच्या मोबदल्यात पैशाची मागणी करीत असतील, काम करताना अडथळा आणून त्रास देण्याचा प्रयत्न करीत असतील तर लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अजितकुमार जाधव यांनी केले आहे.