सातारा दि 3: पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सूचित केलेल्या पाटण विधानसभा मतदार संघातील जलजीवन मिशन अंतर्गतच्या पाणी पुरवठा योजनांचा आढावा येथील शासकीय विश्रामगृहात घेतला.
या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त महादेव घुले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, पाटण विधानसभा मतदार संघात जलजीवन मिशन अंतर्गत एकूण 84 कामे मंजूर आहेत. डोंगरी भागात फेब्रुवारी महिन्यानंतर पाणी टंचाई भासते ही पाणी टंचाई भासू नये व नागरिकांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे यासाठी पाणी पुरवठा योजनांची कामे येत्या फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण करा.
84 कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेने एक नोड अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. हा नोडल अधिकारी प्रत्येक 15 दिवसांनी झालेल्या कामांचा आढावा घेईल. तसेच ज्या कामांमध्ये त्रुटी आहेत त्या कामांच्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी आठवड्यातील एक दिवस द्यावा व त्याच दिवशी कामाच्या संपूर्ण त्रुटींची पूर्तता करावी. त्याचबरोबर प्रत्येक शाखा अभियंत्यांना पूर्ण करावयाच्या कामांची संख्या ठरवून द्यावी व ती वेळेत पूर्ण करावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.
000