Home ताज्या बातम्या पाठिंब्याची पत्रे न मिळाल्याने शिवसेना “वेटिंगवर”

पाठिंब्याची पत्रे न मिळाल्याने शिवसेना “वेटिंगवर”

0

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायमच असून,राष्ट्रवादीने शिवसनेला पाठिंबा देण्याची तयारी दाखवली असली तरी दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत संभ्रम कायम असल्याने काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा ठोस निर्णय न घेतल्याने शिवसेनेपुढे सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे.शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेवून सत्तास्थापनेचा दावा केला आहे,दोन्ही पक्षांची पाठिंब्याची पत्रे देण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे दोन दिवसाचा अवधी वाढवून देण्याची मागणी केली. मात्र मुदत संपल्याने राज्यपालांनी मुदत वाढवून देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शिवसेनेपुढील सत्तास्थापनेच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात दोन्ही काँग्रेस एकत्रित निर्णय घेणार असल्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

आज राज्यात सत्तास्थापनेच्या मोठ्या घडामोडींने वेग घेतला आहे. शिवसेनेने संपूर्ण दिवसभर काँग्रेसच्या पाठिंब्याची वाट पाहिली मात्र दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी सुमारे चार तास झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला गेला नसला तरी त्यांनी याबाबत राष्ट्रवादीचे  अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून एकत्रित निर्णय घेणार असल्याचे जाहीर केल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी आता शिवसेनेला दोन दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुपारपासून पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला होता. मात्र काँग्रेसच्या निर्णयानंतरच आपला निर्णय जाहीर करण्याची भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीला सायंकाळपर्यंत वाट पहावी लागली.राज्यपालांनी शिवसेनेला सायंकाळची साडे सातची वेळ दिल्याने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने साडे सहा वाजता राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत सत्तास्थापनाचा दावा केला. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पाठिंब्याच्या प्रक्रियेसाठी अजून दोन दिवसाचा अवधी मिळावा अशी मागणी राज्यपालांकडे केली.मात्र राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिल्याने शिवसेनेची मोठी अडचण झाली आहे.आजच्या सर्व घडामोडीनंतर राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे सुरू झाल्याची चर्चा आहे. आता पुढील दोन दिवसात राज्यपाल कोणता निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.शिवसेना वेळेत पाठिंब्याची पत्रे सादर करू न शकल्याने राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादीला सरकार स्थापनेसाठी विचारणा केली आहे त्यानुसार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपालांनी भेट घेतली.

 महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचे केंद्रस्थान हे दिल्लीतील काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी याचे निवासस्थान ठरले त्यामुळे दिल्लीत काय निर्णय होतो. त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जयपूर येथे असलेल्या आमदारांशी दुरध्वनी वरून सर्व आमदारांशी चर्चा केली यामधील बहुतेक आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यास समर्थता दर्शविली असली तरी राज्यातील काही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध दर्शविल्याचे समजते. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत बैठकीत ठोस निर्णय झाला नाही.शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.याबाबत दोन्ही काँग्रेस एकत्रित निर्णय जाहीर करू अशी भूमिका काँग्रेसने घेतल्याने राज्यात अभूतपुर्व राजकीय पेच प्रसंग निर्माण झाला आहे. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुढील कोणता निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.