Home बातम्या ऐतिहासिक पाणीटंचाई निवारण्याच्या प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी त्वरित करावी – पालकमंत्री यशोमती ठाकूर

पाणीटंचाई निवारण्याच्या प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी त्वरित करावी – पालकमंत्री यशोमती ठाकूर

0
पाणीटंचाई निवारण्याच्या प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी त्वरित करावी – पालकमंत्री यशोमती ठाकूर

अमरावती दि.28: येत्या काही दिवसात उन्हाळ्याची तीव्रता झपाट्याने वाढेल अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिकांना संभाव्य पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागू नये यासाठी प्रशासनाने पाणी टंचाई  निवारण्याच्या प्रभावी उपाययोजनांची त्वरीत अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले. मोर्शी येथील तहसील कार्यालयातील सभागृहात मोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या 33 गावांच्या पाणी टंचाई निवारणार्थ घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता ढोमणे, अनिल उनराखे, मोर्शी पंचायत समिती सभापती विना बोबडे, उपसभापती सोनाली नवले, सदस्य रुपाली पुड, जया कळसकर, माया वानखेडे, सुनिल कडु, भाऊ छापाने, शंकर उईके, मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसिलदार सागर ढवळे, गटविकास अधिकारी रविंद्र पवार, आदी उपस्थित होते. 

एप्रिल-मे महिन्यात पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता असलेल्या

गावात उपाय योजना सुरु कराव्या

लेहगाव, वाघोली, सावरखेड, शिरखेड, आखतवाडा, बेलापुर, अडगाव, पातुर, शिरुर, शिरलस, राजुरवाडी, निपाणी, तळेगाव, कवठा, भांबोरा, तुळजापुर, मंगरूळ, बोरगव्हाण व धामणगाव याठिकाणी पाण्याची समस्या नसल्याबाबतची माहिती संबंधित गावाच्या सरपंचांनी दिली. परंतु तीव्र उन्ह्याळयात संभाव्य पाणी टंचाईची समस्या नाकारता येत नाही. या गावांमध्ये त्यावर उपाययोजना करण्यात याव्या. लेहगाव येथे हातपंपाची दुरुस्ती, सावरखेड व शिरखेड येथे नवीन टाकीसाठी प्रस्ताव, अडगाव व तळेगाव येथे पाईपलाईनचे काम, शिरलस येथे येत्या एप्रिल-मे महिन्यात विहिरी अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया, धामणगाव येथे हातपंपसाठी प्रस्ताव सादर करण्यात यावे असे निर्देश श्रीमती ठाकुर यांनी संबंधीतांना दिले. गोराळा, विष्णोरा, शिरलस, कमळापुर येथे येत्या काळात विहिरी अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

टंचाईग्रस्त गावात तातडीने सुविधा निर्माण कराव्या

मोर्शी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावातील पाणीटंचाईबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावे. गोराळा, काटपुर, पुसदा, घोडगव्हाण, काटसुर, नया वाठोडा, लिहीदा, रोहनखेड, विचोरी, शिरजगाव, अडगाव, नेरपिंगळाई येथे तीव्र पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये नळ दुरुस्ती, गावातील विहिरींची दुरुस्ती, गाळ काढणे, यासारख्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. असे निर्देश श्रीमती ठाकुर यांनी दिले. शिरजगाव  येथील  अंतर्गत पाईप जोडणीचे काम, रोहणखेड येथे बोअर करण्यात यावे. नेरपिंगळाई, पुसदा येथील टंचाईबाबतचे प्रस्ताव प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सुचना श्रीमती ठाकूर यांनी केल्या. 

जलजीवन मिशन अंतर्गत जास्तीत जास्त कामे पूर्ण करावी

जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी टंचाई वर जास्तीत जास्त उपाययोजना करता येणे शक्य आहे. सर्व ग्रामपंचायतींनी टंचाईबाबतच्या प्रस्तावित कामाबाबत ठराव तात्काळ मंजूर करून प्रशासनास सादर करावा. आवश्यकता असेल त्या गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी साठवण्याच्या नवीन टाकीची निर्मिती, जुन्या पाण्याच्या टाकीचे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात यावे. अशा सूचना श्रीमती ठाकूर यांनी  संबंधिताना दिल्या.