
जिल्ह्यातील काही गावे वगळता पाण्याची मुबलक उपलब्धता; काटोल व नरखेड तालुक्यातील गावांसाठी पाणीप्रश्न सोडविण्यास दक्ष राहण्याचे निर्देश
नागपूर,दि. 25 : जिल्ह्याला मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे. याला काटोल आणि नरखेड तालुक्यातील काही गावे अपवाद आहेत. या तालुक्यात सूमारे आठशे फुटांपेक्षा पाणी पातळी अधिक खोल गेली आहे. ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची दूर्भिक्षता आहे अशी गावे जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित केली आहेत. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तत्परतेने करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनास दिले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यातील पाणी टंचाईबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील पाणी टंचाई अंतर्गत ज्या काही उपाय योजना शासनाने सूचविल्या आहेत त्यावर भर देऊन नाला खोलीकरण व स्त्रोत बळकटीकरण करणे, टँकरग्रस्त गावात जलसंधारणाच्या कामावर भर देणे, अतिरिक्त पाणी नियोजन आराखडा तयार करणे यावर अधिक लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.