पाण्याचा पुनर्वापर करीत 'झिरो डिस्चार्ज' संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

पाण्याचा पुनर्वापर करीत 'झिरो डिस्चार्ज' संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
- Advertisement -

विदर्भ पाणी परिषदेत उपस्थिती

नागपूर , दि. ८ –  नागपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करीत कोराडी येथील ऊर्जा प्रकल्पाला वीज निर्मितीसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याचा पुनर्वापर करीत झिरो डिस्चार्ज ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. पाण्याचा पुनर्वापर करून पुढे जाण्याशिवाय पर्याय नाही. जलसंवर्धनातून विकसित महाराष्ट्र घडवू, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जनकल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती सभागृहात तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पाणी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आयोजित यशोगाथांचे सादरीकरण या सत्रात मंत्री श्री. बावनकुळे बोलत होते.


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, सांगली नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे विलास चौथाई, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. शिरोड कोल्हापूर येथील गणपतराव आप्पासाहेब पाटील, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त राजेंद्र गाडेकर, मुरादपूर सिंचन योजनेचे  रुपेश सयाम, तामसवाडा पॅटर्नचे मिलिंद भगत, वाशिम येथील सचिन कुलकर्णी,  रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प केला आहे. भविष्यात पेयजलाचे आव्हान लक्षात घेता सर्वांनी मिळून या दिशेने काम करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंवर्धनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करीत पिण्याचे पाणी, सिंचन तसेच उद्योगासाठीच्या पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. भविष्यातील पाण्याची समस्या लक्षात घेत सर्वांनी जल संवर्धनात पुढाकार घेण्याची गरज आहे, असे महसूल मंत्री श्री. बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले.

विदर्भातील मृतावस्थेत असलेल्या असंख्य प्रकल्पांना पुनर्जीवित करीत पाण्याचे साठवण करण्याची गरज आहे. अमरावती विभागातील सुमारे ६ हजार ६०० व नागपूर विभागातील ३ हजार असे सुमारे एकूण ९ हजारावर बंधारे दुरुस्त झाल्यास मोठ्या प्रमाणात जल व्यवस्थापन होईल. या दृष्टीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आपल्या परिसरातील मृत बंधारे शोधत त्याची दुरुस्ती करीत जलसंवर्धनाच्या कार्यात मदत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महसूल विभागाच्या वतीने जलसंवर्धनाच्या दृष्टीने नागपूर जिल्ह्यात नाले जोड अभियान राबविले जात आहे. ५ जून ते १५ ऑगस्ट दरम्यान पर्यावरण अभियान राबविण्यात येत असून आईच्या नावाने किमान एक झाड लावण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यशोगाथांचे सादरीकरण

पाणी परिषदेत मुरादपूर येथील रुपेश सयाम यांनी ‘तरंगते सौर ऊर्जा आधारित उपसा सिंचन योजना’ बाबत माहिती देत यशोगाथा सादर केली. पूर्ती जलसिंचन संस्थेचे मिलिंद भगत यांनी ‘तामसवाडा पॅटर्न’ चे सादरीकरण केले. सचिन कुलकर्णी यांनी ‘वाशिम जिल्ह्यातील पाणी व्यवस्थापन’ या विषयावर माहिती दिली. वाशिम जिल्ह्यातील पांगरी महादेव या गावांमध्ये ‘श्रमदान एकी- ग्रामवासीयांची एकी’तून गाव कशाप्रकारे सुजलाम सुफलाम झाले हे यशोगाथेच्या माध्यमातून सांगितले. गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी ‘कृत्रिम निचरा प्रणालीद्वारे क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प’ या विषयातून यशोगाथा सादर केली. विलास चौथाई यांनी ‘सांगली नदी पुनर्जीवन प्रकल्प’ विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन अधिसभा सदस्य डॉ. राज मदनकर यांनी केले तर आभार सांस्कृतिक समन्वयक प्रकाश शुक्ला यांनी मानले.

- Advertisement -