मुंबई: नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणात डॉ. हेमा अनुजा, डॉ. भक्ती म्हेत्रे आणि डॉक्टर अंकिता खंडेलवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबईउच्च न्यायालयाने 2 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावरील बॉण्डवर हा जामीन मंजूर केला आहे. मात्र, या प्रकरणाची सुनावणी सुरू असेपर्यंत या तिन्ही डॉक्टरांचा परवाना रद्द करण्याचे आदेश महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलला दिले आहेत.
पायल तडवी हिला आत्महत्या करण्यास भाग पाडले, असा आरोप डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे व डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्यावर आहे. कित्येक महिने जातीवरून होत असलेला मानसिक छळ, भेदभाव, अपमान याची कथा २६ वर्षीय डॉ. पायल तडवीच्या मैत्रिणीने व अन्य सहकाऱ्यांनी जबाबाद्वारे पोलिसांसमोर सांगितली; आणि याचा उलगडा दोषारोपपत्राद्वारे झाला आहे.
भिल्ल जातीची डॉ. पायल तडवी डॉक्टर होण्यासाठी जळगावातून मुंबईत आली. नायरसारख्या रुग्णालयात आपल्याला शिकण्याची संधी मिळाली, याचा आनंद मानून मोठी स्त्रीरोग तज्ज्ञ होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारी तडवी वयाच्या २६ व्या वर्षी रुग्णालयातील वरिष्ठ सहकाऱ्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आपल्या आयुष्याचा शेवट करण्याचा निर्णय घेते. ‘यांच्याबरोबर (डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहरे व डॉ. अंकिता खंडेलवाल) मी आता एक मिनिटही राहू शकत नाही. गेले एक वर्ष मी त्यांना सहन करत आहे. आता त्यांना सहन करणे अशक्य झाले आहे,’ असे सुसाईड नोटमध्ये नमूद करत आयुष्याचा शेवट हेच या जाचाला उत्तर आहे, असे मानून २२ मे रोजी नायर रुग्णालयाच्या हॉस्टेलमधील राहत्या रूमवर पंख्याला स्टोल अडकवून पायलने आयुष्याचा अंत केला.
दरम्यान, याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींना अटी आणि शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार, आरोपींना मुंबईबाहेर जाता येणार नाही. तसेच, नायर रुग्णालय परिसरातही फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे.