नवी दिल्ली : पुढच्या 5 वर्षात पायाभूत सुविधा प्रकल्पांवर आमचे सरकार 100 लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या मुंबईत असून त्यांनी मुंबई मेट्रोच्या नव्या मार्गाचे उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत कार्यक्रमाला राज्यपाल भगत कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित आहेत. यावेळी पंतप्रधानांनी स्वदेशी मेट्रो कोच आणि नव्या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटनही केले. हा स्वदेशी मेट्रो कोच मेक इन इंडीया अंतर्गत बनवला आहे. पंतप्रधान मोदींनी मेट्रो रेल्वेचे व्हिजन डॉक्यूमेंटही सादर केले.
मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेने मला खूप प्रेम दिले. निवडणूक प्रचारादरम्यान जिथेही मी गेलो तिथे स्नेह मिळाले यासाठी मी सर्वांचे आभारी असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. सध्याचे राज्यपाल यांच्या मागर्दशनाखाली उत्तराखंडमध्ये मी काम केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मी रशियामध्ये होतो तेव्हा मुंबईबद्दलची माहिती घेत होतो असेही त्यांनी मुंबईकरांना सांगितले. मुंबई दौऱ्यातही त्यांनी इस्त्रोच्या वैज्ञानिकांची पाठ थोपाटली. इस्रोचे शास्त्रज्ञ यांनी जे विपरीत परिस्थितीमध्ये काम केले त्याला तोड नाही असे ते म्हणाले.
एका तिकीट वर सर्व वाहतूक व्यवस्था चालेल प्रवास करता येईल आणि असं करणारं देशातील पहिले शहर हे मुंबई शहर असेल असे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 2024 मध्ये मेट्रोचे मार्ग पूर्ण होतील ज्यामुळे एक कोटींपेक्षा जास्त लोकं ही मेट्रोने प्रवास करू शकतील असे ते म्हणाले.
मी त्यांना म्हणालो किती गोष्टीसाठी अभिनंदन करू तुमचे…तुम्ही 370 बाबत निर्णय प्रत्यक्षात आणून दाखवले आहे, चंद्राला गवसणी घातली आहे, तेव्हा तुम्ही ( मोदी ) नजीकच्या काळात अयोध्यामध्ये राम मंदिर उभे करून दाखवल्याशिवाय रहाणार नाहीत याची मला खात्री आहे. देशाला दिशा दाखवणारा, सक्षम नेता मोदी यांच्या रूपाने सापडला असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक केले.
येणार ते युतीचेच सरकार येणार असे म्हणत करायचे ते दिलखुलासपणे करायचे, आम्हाला सत्ता हवी आहे ती राज्याचा विकास करण्यासाठी असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी युतीचा मुद्दाही समोर आणला.