सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : दिवाळी सणानिमित्त सामान्य नागरिकांना आधार मिळण्यासाठी शासनाने राज्यात शंभर रूपयांमध्ये चार शिधावस्तुंचा संच देण्याचा निर्णय शासनाने घेतला. सर्व पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळेल. स्वस्त धान्य दुकानदारांनी सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रामाणिकपणे व पारदर्शकता ठेवून शिधाजिन्नस संचाचे वाटप करावे, असे आवाहन कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.
एन. एस. मुलाणी स्वस्तधान्य दुकान मिरज येथे शिधाजिन्नस वाटप कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे बोलत होते. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी सुमन खाडे, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, तहसिलदार दगडू कुंभार, महानगरपालिका समाज कल्याण सभापती अनिता व्हनखंडे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल, श्री. व्हनखंडे आदि उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेल या चार वस्तुंच्या शिधाजिन्नस संचाचे अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी दिवाळी सुख समाधानाची व आनंदाची जावो, अशा शुभेच्छा सर्वांना दिल्या.
यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल यांनी शासनाच्या या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती देवून उपस्थित सर्वांचे आभार मानले.
00000