Home शहरे जळगाव पारोळा तालुक्यातील म्हसवेनजीक ग्रामसेवकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

पारोळा तालुक्यातील म्हसवेनजीक ग्रामसेवकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

0

पारोळा, जि.जळगाव : वर्धमाननगरातील रहिवासी तथा रवंजे, ता.एरंडोल येथील ग्रामसेवक दिलीप काशिनाथ पाटील यांच्या दुचाकीला कारने धडक दिल्याने ते नाल्यात पडले. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. २३ रोजी घडना घडल्यानंतर २४ तासांनी त्यांचा मृतदेह नाल्यातील पाण्यात आढळला.
सूत्रांनुसार, रवंजे, ता.एरंडोल येथे ग्रामसभेला ड्युटीवर जाण्यासाठी दिलीप काशिनाथ पाटील (५२) हे मोटारसायकल (एमएच-१९-डीई- ५२६९) ने २३ रोजी सकाळी ६ वाजता घरून निघाले होते. पारोळ्यापासून चार कि.मी. अंतरावर पारोळा-एरंडोल आशिया महामार्ग ४६ वर म्हसवे गावानजीकच्या पुलावरून जात असताना त्यांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कार (एमएच-४३-बी-९८२०) ने जबर धडक दिली. ते मोटारसायकलवरून पुलावरून जंजनी नाला (धोबीघाट) पाण्यातील नाल्यात फेकले गेले. डोक्याला जबर मार लागला. पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनास्थळावरून त्यांना रुग्णवाहिका चालक ईश्वर व यश ठाकूर, दीपक सोनार यांनी पारोळा कुटीर रुग्णालयात आणले. त्यांचे शवविच्छेदन करून सायंकाळी ५ वाजता त्यांच्या मूळ गावी पिंप्री प्र. अ. ता.पारोळा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
अपघाताबाबत विजय रमेश पाटील रा.म्हसवे यांनी पारोळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.काँ. प्रकाश चौधरी करीत आहे.
घटनास्थळी फक्त मोटारसायकल असल्याने सर्व संभ्रमात
ग्रामसेवक दिलीप पाटील यांची अपघातस्थळी फक्त मोटारसायकल व थोड्या अंतरावर सोबत असलेली बॅग आढळली. ते अपघातस्थळी नाहीत. त्यांना उपचारासाठी धुळे येथे कोणी हलविले, अशी वार्ता त्यांच्या पत्नीच्या कानावर आली. त्यांनी तत्काळ धुळे गाठले. धुळे येथील सर्व खासगी व सरकार दवाखाने त्या माउलीने पालथे घातले. पण ते कोणत्याच दवाखान्यात ते आढळले नाही. तोपर्यंत रात्री बराच उशीर झाला होता. दुसºया दिवशी २४ रोजी मग सकाळी घटनास्थळाजवळील पुलाच्या खाली पाण्यात त्यांचा मृतदेह आढळला. २४ तासापर्यंत मृतदेह हा या नाल्याच्या पाण्यात पडून होता.
हातातील घड्याळ बंद पडले ६.२०ला
अपघात झाला तेव्हा ग्रामसेवक पाटील हे २३ रोजी सकाळी ६ वाजता पुलावरून पाण्यात पडले. पाण्यात बुडून २० मिनिटांत त्यांचा मृत्यू झाला असावा, हे त्यांच्या हातातील बंद पडलेल्या ६.२० ची वेळ सांगून गेली.
पत्नीचा एकच आक्रोश
पतीचा मृतदेह पाहिल्यावर त्यांच्या पत्नीने एकच हंबरडा फोडला. हे पाहून उपस्थितांचे मन हेलावले. मुलगा हा बाहेरगावी शिक्षण घेतो.
कारचालकाचा पाठलाग
सकाळी अपघात झाला तेव्हा याच कॉलनीतील रहिवाशी असलेला एक मुलगा खाजगी गाडीने जळगावला निघाला होता. त्याने हा अपघात पाहिला. नेमका अपघात नेमका अपघात कोणाचा हे समजले नाही. तो मुलगा कारचालकाचा पाठलाग करीत एरंडोलपर्यंत गेला. कार नंबर घेत तो पोलिसांना कळविल्याची माहिती पुढे आली व तो कारचालक कोण याचा शोध पारोळा पोलीस घेत आहेत.
दिलीप पाटील हे गतकाळात ग्रामसेवक सहकारी पतपेढीचे चेअरमन होते. काही काळ पारोळा तालुका ग्रामसेवक संघटनेचे महत्त्वाचे पद सांभाळत नेतृत्व केले होते.