
नागपूर, दि. २० : महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर शहर व ग्रामीण भागात पोलीस स्टेशन उभारण्यासह विविध विषयांसह बैठक घेत आढावा घेतला.
आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधुरी खोडे-चवरे, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व केंद्रस्थ अधिकारी नरेश झुरमुरे, मुख्य वनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी आदी यावेळी उपस्थित होते.
नागपूर शहर व परिसरात वाढती लोकसंख्या लक्षात घेता गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस विभागाच्या नागपूर ग्रामीण, शहर व आयुक्तालय हद्दीत नव्याने पोलीस स्टेशन उभारण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करून शासनास सादर करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. यासोबतच महसूल व वने, मृद व जलसंधारण विभागासंदर्भातील विविध विषयांवर श्री. बावनकुळे यांनी यावेळी निर्देश दिले.
०००००