भंडारा, दि. 1 मे : पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी आज सकाळी भंडाऱ्याकडे येत असताना मौद्याजवळ त्यांना अपघात झाल्याचे दिसून आले. त्या अपघातात जखमी महिलेच्या डोक्याला जोराचा मार लागला होता व त्यातून रक्तस्त्राव सुरू होता. जखमींची परिस्थिती बघता श्री. कदम यांनी संवेदनशीलतेचा परिचय देत तातडीने अपघातग्रस्तांना आपल्या गाडीमध्ये बसवून भंडारा विश्रामगृह येथे आणले.
पुढील वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा शल्यचिकित्सक श्री. रियाझ फारूकी यांना संपर्क करून कार्यवाही करण्याचे निर्देशित केले. त्यांनी जखमीसाठी रुग्णवाहिका विश्रामगृहावर पाठवली. वेळ न दवडता जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. जखमी दमयंती येले वय वर्षे 45 रा. मुंडीपार ता. सडक अर्जुनी जि. गोंदिया यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरू केले. पालकमंत्र्यांच्या या सहृदयतेने अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळाल्याने नातेवाईकांनी श्री. कदम यांचे आभार मानले.
000