ताडदेवमधील म्युनिसिपल शाळा, बने कंपाउंडमध्ये नवीन केंद्र सुरू झाले असून तिथे एक्स-रेसह इतर सर्व व्यवस्था केली आहे. तीन मजली शाळेत रुग्णांना आवश्यक त्या सुविधा मिळतील, याची काळजी घेतली जात आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यासह एक्स-रे, वाफ घेण्यासाठी सुविधेचाही समावेश आहे. रुग्णांना आंघोळ करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्थादेखील केली आहे. त्यासह प्रशिक्षित डॉक्टर, नर्स आदींची नियुक्ती केली आहे. रुग्णांची जेवणाची आबाळ होऊ नये म्हणूनही तशी तजवीज केली आहे. तसेच, इथे सेवा बजाविणाऱ्या डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांसाठीही उत्तम व्यवस्था केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात करोनाचा वाढलेला कहर पाहून अतिरिक्त करोना केंद्रांची निकड निर्माण झाली आहे. भविष्यकालीन तरतूद म्हणून ही करोना केंद्र उपयुक्त ठरणार आहेत. सध्याचे ऊन आणि आगामी पावसाळा पाहता पालिका शाळेतील विलगीकरण कक्ष रुग्णांसाठी फायदेशीर ठरणार आहे. परिसरातील छोट्या घरांत राहणाऱ्या रुग्णांसाठी विलगीकरणाची समस्या निर्माण होते. त्यांच्यासाठी हे केंद्राचा फायदा होणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
अल्पावधीत उभारणी
ताडदेव येथे पालिकेच्या बने कंपाउंड शाळेचा उपयोग करोना केंद्रासाठी केला आहे. जीवन ज्योत ड्रग बँक या स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने ताडेदव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पुढाकाराने केंद्र उभे राहिले आहे. त्यासाठी विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी सक्रिय सहभाग घेतला आहे. त्याआधारे अल्पावधीतच केंद्र सेवेत आले असून त्यामुळे इतर केंद्रांवरील ताणदेखील कमी होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी पालिकेसोबत ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली आहे.