पावसात सभा घेण्याची वेळ आलीच नसती; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

- Advertisement -

पावसात सभा घेण्याची वेळ आलीच नसती; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

तेव्हा जर तुम्ही ७० हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर तुम्हाला आज पावसात सभा घेण्याची वेळ आलीच नसती असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. शरद पवार यांची शुक्रवारी साताऱ्यात सभा पार पडली. यावेळी पाऊस सुरु असतानाही शरद पवारांनी भाषण न थांबता भिजत उपस्थितांना संबोधित केलं. एकीकडे शरद पवार यांचं कौतुक होत असताना उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची साताऱ्यातील माण येथे सभा पार पडली.

“राष्ट्रवादीवाले भर पावसामध्ये सभा घेत आहेत, पण गावांमध्ये ठणठणाट आहे. तेव्हा जर तुम्ही ७० हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर तुम्हाला आज पावसात सभा घेण्याची वेळ आलीच नसती,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. “जेव्हा करायचं होतं तेव्हा केलं नाही आणि आता आपलं सरकार मजबूतपणाने पुढे पाऊल टाकत आहे तेव्हा त्याला अपशकुन करायचा,” अशीही टीका त्यांनी केली. “एका विचारांचं स्थिर सरकार आपण या महाराष्ट्राला दिलं,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

“समाजा समाजामध्ये भिंती उभ्या करायच्या असे का करायचे? शिवरायांनी या भिंती तोडून टाकल्या आणि समाजाला एका पवित्र भगव्या झेंड्याखाली एकवटले होते. बारा मावळे एकवटल्या नंतर जी ताकद उभी राहिली ती महाराष्ट्र नाही देश नाही तर पूर्ण जगाचे डोळे दिपवणारी होती. ४५० वर्षांनंतरसुद्धा हा देश असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज की जय बोललं की अंगावर रोमांच उभे राहतात,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

“मराठा समाजाच्या मागे जशी शिवसेना उभी राहिली तशी धनगर आणि माळी समाजाच्या मागेही शिवसेना उभी आहे. प्रत्येक जातीला पोट असतं, पण पोटाला जात लावू नका अशी शिकवण शिवसेनाप्रमुखांनी दिली आहे. प्रत्येक उपाशी पोट हे भरले गेले पाहिजे ही शिवरायांची शिकवण शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला वारंवार दिली,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

यावेळी उद्धव ठाकरेंनी १० रुपयांमध्ये मी माझ्या गरीब जनतेला जेवण देणार म्हणजे देणारच असं आश्वासन दिलं. तसंच एका रुपयात प्राथमिक आरोग्य चाचणी करणार, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असंही आश्वासन दिलं.

- Advertisement -