पावसाळी पूर व्यवस्थापनासाठी आंतरराज्यीय समन्वय बैठक संपन्न – महासंवाद

पावसाळी पूर व्यवस्थापनासाठी आंतरराज्यीय समन्वय बैठक संपन्न – महासंवाद
- Advertisement -

पावसाळी पूर व्यवस्थापनासाठी आंतरराज्यीय समन्वय बैठक संपन्न – महासंवाद

सांगली, दि. 27 (जि. मा. का.) – आगामी पावसाळ्यात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य पूर नियंत्रण आणि जलाशयांचे व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आंतरराज्यीय समन्वय बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली.

या बैठकीत आगामी पावसाळ्यात पूर व्यवस्थापन अधिक प्रभावी पद्धतीने करण्यासाठी व सामान्य नागरिकांना दिलासा देऊन हानी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच, पाणीपातळीची देवाणघेवाण व अन्य उपाययोजनांच्या अनुषंगाने कर्नाटकचे प्रतिनिधी वारणा धरण, कोयना धरण व कोल्हापूर पद्धतीच्या राजापूर बंधाऱ्याच्या ठिकाणी तर सांगलीचे पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी आलमट्टी धरणाच्या ठिकाणी समन्वय अधिकारी म्हणून नेमले जातील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीस सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथून जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे व कार्यकारी अभियंता ज्योती देवकर प्रत्यक्ष उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, विजयपूरचे जिल्हाधिकारी संबित मिश्रा, अलमट्टी धरणाचे मुख्य अभियंता यांच्यासह सांगली, कोल्हापूर व कर्नाटकातील विजयपूर, बागलकोट, बेळगाव या पूरप्रवण जिल्ह्यातील जलव्यवस्थापनाशी निगडित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दोन्ही राज्यांमधील संबंधित जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांनी परस्पर समन्वयाने पूर व्यवस्थापनासाठी ठोस नियोजन करण्याबद्दल चर्चा केली. सुसूत्र समन्वयद्वारे सांघिक आपत्ती व्यवस्थापन करण्याबाबत सर्वांनी निर्णय घेतला.

या बैठकीत संभाव्य पूर परिस्थितीत प्रभावी निर्णय घेण्याच्या दृष्टीने अलमट्टी धरणातील जलपातळी १५ ऑगस्टपर्यंत ५१७.०० ते ५१७.५० मीटर दरम्यान राखणे, हिप्परगी बंधाऱ्याचे दरवाजे पूर काळात उघडे ठेवणे, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील पाणी अडविण्यासाठीचे बर्गे पावसाळ्यापूर्वी काढून घेणे, नदीपात्रामध्ये पूल, बंधारे किंवा इतर बांधकामासाठी पाणी अडविण्यासाठी घालण्यात आलेले बांध काढून टाकणे, रियल टाइम डाटा बेस यंत्रणेचा विस्तार नारायणपूर धरणापर्यंत कार्यान्वित करणे या बाबीवर चर्चा करण्यात आली.

संभाव्य पूर व्यवस्थापनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्य सचिवांच्या संयुक्त समितीची बैठक दि. २९ मे रोजी घेण्यात येणार आहे.

०००००

- Advertisement -