सोलापूर – शहर व जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना राबवा, अशा सूचना पालक सचिव अतुल पाटणे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.
पालक सचिव पाटणे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्याशी व्हीसीद्वारे संवाद साधला.
पाटणे म्हणाले, शहरात तसेच ग्रामीण भागात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून प्रभावीपणे पावले उचलणे अपेक्षित आहेत. आता नागरिक घराबाहेर पडतील, दुकाने सुरू होतील त्यामध्ये पावसाळा सुरू होत असल्याने वेळीच दक्षता घेऊन संभाव्य धोका टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवा. नागरिकांनी कोरोना संदर्भात योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, यासाठी विशिष्ट कार्यक्रम हाती घ्या, अशा सूचना श्री.पाटणे यांनी यावेळी केल्या. सरकारी रुग्णालयांवर ताण पडत असल्याने खासगी दवाखाने कोविड, नॉन कोविड उपचारासाठी अधिग्रहित करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ, पोलीस आयुक्त शिंदे यांनी व्हीसीमध्ये सहभाग घेतला.
यंत्रमाग, विडी उद्योगाबाबत सकारात्मक निर्णय घ्या
सोलापूर शहरातील यंत्रमाग व विडी उद्योग सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे सांगून पालक सचिव श्री.पाटणे यांनी विडी कामगारांना घरपोच कच्चामाल पुरवठा करता येतो का? तसेच यंत्रमाग कामगारांना कारखान्यात ने-आण करण्याकरिता बसेस ठरवून योग्य ती खबरदारी घेत औद्योगिक प्रकल्प सुरू करता येते का हे पहावे असे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर आणि महानगरपालिकेचे आयुक्त शिवशंकर यांनी यासंदर्भाची माहिती दिली. सोलापूरात स्थलांतरित मजूर व नागरिकांची संख्या वाढली आहे. भविष्यात त्यांना रोजगाराची आवश्यकता आहे, त्यासाठीही औद्योगिक प्रकल्प सुरु होणे आवश्यक आहे, असेही श्री.पाटणे यांनी यावेळी सांगितले.
शैक्षणिक वर्षाची तयारी ठेवा
शाळा-कॉलेज सुरू होण्याच्या दृष्टीने तयारी ठेवावी. विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना जाती दाखला, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला आदी विविध कागदपत्रे लागतात त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना कागदपत्रे मिळण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांच्याकडून त्यांनी यावेळी शाळा सुरू करण्यासंदर्भात माहिती जाणून घेतली. ऑनलाइन अभ्यास व शिक्षण या संदर्भातील आढावा श्री.पाटणे यांनी घेतला.