मुंबई, दि. ८ : राज्यभरात पावसाचा जोर कायम असून पावसाची संबंधित दुर्घटनांमध्ये सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. वीज पडणे, दरडी कासळणे, झाडे पडणे पूर व तत्सम दुर्घटनांमध्ये जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत असून नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा आणि पुणे जिल्ह्यांत दरडी कोसळणे आणि चिखलाचा प्रवाह (मडफ्लो) यांसारख्या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले.
वीज अंगावर पडून नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, नांदेड, धुळे, जळगाव, जालना, पुणे, चंद्रपूर, सोलापूर, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांत २३ जणांचा मृत्यू झाला आणि १७ जण जखमी झाले.
झाडे पडण्याच्या घटनांमुळे अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, भंडारा आणि अकोला या जिल्ह्यांत सहा जणांचा मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाले. या घटनांमध्ये ११ प्राण्यांचा मृत्यू झाला आणि सात प्राणी जखमी झाले.
पूरसदृश किंवा पुराशी संबंधित घटनांमुळे वर्धा, पालघर, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांत दोन जणांचा मृत्यू झाला. प्राण्यांची जीवितहानी झाल्याची नोंद नाही. जालना, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पाच जनावरांचा मृत्यू झाला.
अहिल्यानगर, नाशिक, सातारा, रत्नागिरी, सोलापूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, धुळे, पुणे, नागपूर आणि परभणी जिल्ह्यांमध्ये बांधकामे कोसळण्याच्या घटना घडल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने कळविले आहे.
0000
किरण वाघ/विसंअ


















WhatsApp