पीक पोषण शिखर परिषदेमुळे ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला बळ – पणनमंत्री जयकुमार रावल – महासंवाद

पीक पोषण शिखर परिषदेमुळे ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला बळ – पणनमंत्री जयकुमार रावल – महासंवाद
- Advertisement -

पीक पोषण शिखर परिषदेमुळे ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला बळ – पणनमंत्री जयकुमार रावल – महासंवाद

मुंबई, दि. 5:  ‘कन्वर्ज, कोलॅबोरेट अँड को-क्रिएट’ ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. इंडियन मायक्रो फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या मुंबईत आयोजित परिषदेच्या माध्यमातून या संकल्पनेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.

इंडियन मायक्रो फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयएमएमए) यांच्या वतीने मुंबई येथे सहाव्या दोन दिवसीय राष्ट्रीय पीक पोषण शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत मुख्य अतिथी म्हणून मंत्री जयकुमार रावल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री जयकुमार रावल म्हणाले, मायक्रो फर्टिलायझर आणि सूक्ष्म अन्नद्रव्य उद्योगाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारत आज जगाचा अन्नधान्य साठवणूक केंद्र आणि अन्न हब म्हणून ओळखला जात असून, या यशात खत उद्योगाचा मोठा वाटा आहे. अन्न हीच आपली खरी ताकद आहे. अन्नाशिवाय जीवन शक्य नाही, त्यामुळे या सामर्थ्याचा योग्य उपयोग केला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकरी, बियाणे उद्योग, सूक्ष्म अन्नद्रव्य उद्योग, खत उद्योग, काढणीपश्चात प्रक्रिया आणि अन्नप्रक्रिया उद्योग यांनी एकत्रितपणे काम केल्यास शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल आणि देशाची आर्थिक ताकद वाढेल, असा विश्वास मंत्री रावल यांनी व्यक्त केला. आयएमएमए ही संस्था 1983 पासून कार्यरत असून, गेल्या अनेक दशकात पिकांची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता वाढविण्यात तिने उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.

जागतिक परिस्थिती सतत बदलत असताना भारताने 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ बनण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी संशोधन व विकासावर भर दिला आहे. या अनुषंगाने नवीन उत्पादने, नवीन सूक्ष्म अन्नद्रव्ये विकसित करून भारतीय कृषी उद्योगाला जागतिक पातळीवर नेतृत्वस्थानी नेण्याचे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन एमएसएमई क्षेत्रातील उद्योगांसोबत ठामपणे उभे असल्याचे सांगत, आपण सर्वांनी मिळून आत्मनिर्भर, सक्षम आणि जागतिक नेतृत्व करणारा भारत घडवूया, असे आवाहन मंत्री रावल यांनी केले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

- Advertisement -