Home गुन्हा पुणे गुन्हे शाखा युनिट 3 ची उत्तम कारवाई तडीपार गुंडाला ठोकल्या बेड्या पिस्तूलसह 2 काडतूस जप्त

पुणे गुन्हे शाखा युनिट 3 ची उत्तम कारवाई तडीपार गुंडाला ठोकल्या बेड्या पिस्तूलसह 2 काडतूस जप्त

0

पुणे गुन्हे शाखा युनिट 3 ची उत्तम कारवाई तडीपार गुंडाला ठोकल्या बेड्या पिस्तूलसह 2 काडतूस जप्त

दर्शन पोलीस टाइम : परवेज शेख

कोरोना संकट काळात तडीपारीचे उल्लंघन करून पुणे शहरात आलेल्या गुंडाला पुणे गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाने बेड्या ठोकल्या. कारवाई दरम्यान या आरोपीकडून एक पिस्तूल व 2 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. सदर गुंडाने तडीपारीचे उल्लंघन करून बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत साथीदारासोबत एका इसमावर वार केले होते. या गुन्ह्यात हा आरोपी फरार होता. त्यामुळे या गुन्ह्याचीही उकल झाल्याचे युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले.


कोरोना संकट काळात सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फायदा घेऊन तडीपार गुंड पुणे शहरात आले होते. या गुंडांना तात्काळ अटक करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले. त्यानुसार युनिट 3 च्या पथकाची शोधमोहीम सुरू असताना पोलीस नाईक अतुल साठे व हवालदार संतोष क्षीरसागर यांना खबऱ्या तडीपार गुंडाची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ गणेश विसर्जन घाट येथे सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार तडीपार गुंड अक्षय आधवडे (26, रा. सुपर अप्पर, इंदिरा नगर, व्हीआयटी कॉलेज, पुणे) याला ताब्यात घेतले. अक्षयची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पिस्तूल व 2 काडतूस (किंमत 30 हजार 400 रुपये) आढळून आले.

तडीपारीचे उल्लंघन करून बेकायदेशीर हत्यार बाळगल्या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (गु.र.क्र. 1525/2020) भारतीय हत्यार कायदा कलम 3 (25) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142, 37 (1) (3) सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच तडीपार आदेश उल्लंघन करून अक्षय याने एका इसमावर वार केले होते. या प्रकरणी दाखल बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (गु.र.क्र. 95/2020) भादंवि कलम 326, 504, 506, 34 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अक्षय पोलिसांच्या हाती लागल्यामुळे या गुन्ह्याची देखील उकल झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण अडागळे करत आहेत.
सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, गुन्हे प्रकटीकरणचे उपायुक्त बच्चन सिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे प्रतिबंधक) डॉ. शिवाजी पवार, युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, पोलीस उपनिरीक्षक किरण अडागळे, अंमलदार दत्तात्रय गरुड, दीपक मते, राहुल घाडगे, संतोष क्षीरसागर, अतुल साठे, प्रवीण तपकीर, मच्छिंद्र वाळके, गजानन गाणबोटे, मेहबुब मोकाशी, सुजीत पवार आदी पथकाने केली.