Home शहरे पुणे पुणे जिल्ह्यातील ४२० रुग्णालयांचे फायर ऑडिट पूर्ण

पुणे जिल्ह्यातील ४२० रुग्णालयांचे फायर ऑडिट पूर्ण

0
पुणे जिल्ह्यातील ४२० रुग्णालयांचे फायर ऑडिट पूर्ण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या विरारमधील रुग्णालयामध्ये आग लागण्याची घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट सुरू केले आहे. या सर्व ठिकाणच्या एकूण ७२२ रुग्णालयांपैकी पुणे शहरातील १८५, पिंपरी-चिंचवडमधील ४० आणि जिल्ह्यातील १९५ अशा ४२० रुग्णालयांचे ऑडिट पूर्ण झाले आहे. उर्वरित ३०२ रुग्णालयांचे ऑडिट करण्याचे काम सुरू आहे. ‘ऑडिट झालेल्या रुग्णालयांमध्ये आढळून आलेल्या त्रुटी १५ दिवसांमध्ये दूर कराव्यात,’ असे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

रुग्णालयांमध्ये दुर्घटना घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास महामंडळाचे (पीएमआरडीए) आयुक्त सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीकडून रुग्णालयांमध्ये जाऊन पाहणी करण्यात येत आहे.

याबाबत विभागीय आयुक्त राव म्हणाले, ‘पुणे शहरातील १९१ रुग्णालयांचे ऑडिट करण्यात येणार आहे. त्यापैकी १८५ रुग्णालयांचे ऑडिट करण्यात आले असून, सहा रुग्णालयांचे ऑडिटचे काम अद्याप अपूर्ण आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १३३ रुग्णालयांचे ऑडिट केले जाणार असून, ४० रुग्णालयांचे ऑडिट झाले आहे. उर्वरित ९३ रुग्णालयांची ऑडिट झालेले नाही.’

‘जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील ३९८ रुग्णालयांचे ऑडिट करण्यात येणार आहे. त्यामध्ये २७६ रुग्णालये ही खासगी असून, १२२ रुग्णालये ही सरकारी आहेत. त्यापैकी १९५ रुग्णालयांचे ऑडिट झाले आहे. उर्वरित २०३ रुग्णालयांचे ऑडिट पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,’ असे राव यांनी स्पष्ट केले. ‘रुग्णालयांचे ऑडिट करताना काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या त्रुटी जास्तीत जास्त १५ दिवसांत दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत,’ असे राव यांनी सांगितले.

ठळक त्रुटी

– संकटसमयी बाहेर जाण्यासाठी दुसरा मार्ग नाही.

– आग विझविण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची कमतरता.

– वातानुकूलन यंत्रणा आणि विद्युत उपकरणांमध्ये दोष.

– रुग्णालयांमध्ये अग्निशमन सिलिंडरची उपलब्धता नाही.

फायर ऑडिटची सद्यस्थिती

क्षेत्र : रुग्णालये – ऑडिट पूर्ण – ऑडिट अपूर्ण

पुणे महापालिका : १९१ – १८५ – ६

पिंपरी-चिंचवड महापालिका : १३३ – ४० – ९३

जिल्ह्याचा ग्रामीण भाग : ३९८ – १९५ – २०३

एकूण : ७२२ – ४२० – ३०२

Source link