पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनेरी पान – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनेरी पान – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
- Advertisement -

पुणे दि.२: पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनरी पान आहे आणि यातून अनेक लोकांना प्रेरणा मिळाली आहे. समाजासमोर गुणवान व्यक्तींचा आदर्श प्रस्तूत करण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

३४ व्या पुणे फेस्टिवलच्या उद्घान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, उदयनराजे भोसले, हेमामालिनी, आमदार भिमराव तापकीर, माधुरी मिसाळ,अभिनेता सुनील शेट्टी, पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, उपाध्यक्ष कृष्ण कुमार गोयल, डॉ.सतीश देसाई आदी उपस्थित होते.

श्री.गडकरी म्हणाले, पुणे फेस्टीवलमधील पुरस्कारार्थीचा देशात गौरव आहे. पुण्याला विज्ञान, तंत्रज्ञान, संगीत, नाटक, साहित्य, साधना, शिक्षणाचा समृद्ध वारसा असून हे वैभव पुढे नेणे महत्वाचे आहे. ही शहराची खऱ्या अर्थाने समृद्धी आहे आणि ती जपण्याचे कार्य पुणे फेस्टिवलने केले आहे. या उत्सवाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व समाजासमोर आले आहेत.

पुणे ही देशाची सांस्कृतिक राजधानी आहे. म्हणून इथे घडणाऱ्या घटनांचा परिणाम देशात होत असतो. इथल्या महापुरुषांनी देशाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. समाज परिवर्तनासाठी नृत्य, संगीत, कला, क्रीडा अत्यंत आवश्यक आहे. या सर्व घटकांमध्ये एक संस्कार असून त्यांचा परिणाम माणसाच्या जीवनावर होत असतो. पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून अशा बाबींना प्रोत्साहन देण्यात येवून हा उत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोविण्यात यश आले आहे.

पुण्याचे विमानतळ, मेट्रो यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. दीड लाख कोटींची कामे या परिसरात करण्यात येत आहेत. पुण्याच्या रिंगरोडचे कामही सुरू करण्यात येणार आहे. पालखी मार्गाच्या कामालाही गती देण्यात येत आहे. १२ हजार कोटी रुपये खर्च करून हा मार्ग पूर्ण होणे हा जीवनातील आनंदाचा क्षण असेल, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

श्री.फडणवीस म्हणाले, गेल्या ३४ वर्षात पुणे फेस्टिवलने पुण्याला वेगळी ओळख दिली आहे. परकीय आक्रमणकर्त्याने पुणे बेचिराख केले आणि गाढवांचा नांगर इथे फिरवला. आई जिजाऊंच्या आशिर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला आणि तेव्हापासून इथे नररत्नांची खाण सुरू झाली. पुण्यात एकापेक्षा समाज बदलणारे आणि खऱ्या अर्थाने लोकांना प्रेरणा देणारे सर्व क्षेत्रातले लोक पहायला मिळतात.

आज आपण व्हर्चुअल डिजीटल युगात आहोत. या युगात आपण प्रत्येकाची अभिव्यक्ती रेकॉर्ड करून व्हर्चुअल प्लॅटफॉर्मवर टाकतो. ३४ वर्षापूर्वी अशी सुविधा नसताना सर्व गुणांची प्रत्यक्ष अभिव्यक्ती प्रेक्षकांसमोर ठेवणाऱ्या पुणे फेस्टीवलची सुरूवात करण्यात आली. इथे ज्यांचा गौरव होतो ते आपल्या क्षेत्रात खूप पुढे जातात, असे त्यांनी सांगितले. पुणे फेस्टिव्हल जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य अतुलनीय आहे. सर्वच पुरस्कारार्थींनी आपापल्या क्षेत्रात उत्तम कार्य केल्याचेही ते म्हणाले.

शतकोत्तर प्रवास पूर्ण केलेल्या नवचैतन्य गणेश मंडळ डेक्कन जिमखाना आणि शुक्रवार पेठ येथील राजर्षी शाहू गणेश मंडळांचा यावेळी श्री.गडकरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला. पुणे फेस्टिवलच्या प्रवासावर आधारीत स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शां.ब.मुजुमदार यांना पुणे फेस्टिवलचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणारे ॲड.एस.के.जैन, डॉ.भूषण पटवर्धन, लेखिका सई परांजपे, कलाकार प्रविण तरडे यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राहुल देशपांडे यांनाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

यावेळी खासदार हेमा मालिनी म्हणाल्या, पुणे फेस्टिवल व माझे घनिष्ठ नाते आहे. नवनवीन कलाकारांना या फेस्टिवलच्या माध्यमातून संधी देऊन त्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे.

खासदार श्री. भोसले यांनी, पुणे फेस्टिवलपासून प्रेरणा घेवूनच आपल्या महाविद्यालयीन जीवनात गणेश फेस्टिवलची सुरुवात केल्याची आठवण सांगून पुणे फेस्टीवलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ लेखिका सई परांजपे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी अभिनेत्री हेमामालिनी यांनी गणेश वंदनावरील नृत्य सादर केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षा निमित्त ‘हमारा अतुल्य भारत’ कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. भावपूर्ण व भक्तीपूर्ण वारी देखावा, लावणी, भांगडा, घुमर नृत्यासोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

भारतरत्न स्व.लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी, पंडित शिवकुमार शर्मा, यांना गीताच्या माध्यमातून स्वर स्वरांजली वाहिली.

000

- Advertisement -