पुणे महापालिकेला १५०० ‘रेमडेसिव्हिर’

- Advertisement -

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेच्या हद्दीतील ‘रेमडेसिव्हिर’चा तुटवडा कमी व्हावा यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्या प्रयत्नांतून एक हजार ५०० इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ यांनी दिलेल्या ‘सीएसआर’मधून ७०० इंजेक्शन खरेदी केल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

रुग्णांची होणारी अडचण लक्षात घेता रासने यांनी ही इंजेक्शन मिळविण्यासाठी प्रयत्न केले. पहिल्या टप्प्यात ८०० इंजेक्शन, तर दुसऱ्या टप्प्यात ७०० इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यातील ७०० इंजेक्शनही पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ यांनी दिलेल्या ‘सीएसआर’मधून खरेदी करण्यात आली आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असल्याने या इंजेक्शनचा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया महापालिकेच्या डॉक्टरांनी व्यक्त केली.

महापालिकेने २५ हजार इंजेक्शनसाठी वितरकांना कार्यादेश दिले आहेत. त्यांच्याकडून अद्याप इंजेक्शन प्राप्त झालेली नाहीत. याशिवाय या इंजेक्शनच्या खरेदीसाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती. या निविदांनाही वितरक; तसेच कंपन्यांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही.

.

महापालिकेने २५ हजार इंजेक्शन खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ही इंजेक्शन मिळाल्यास ज्या रुग्णांची ऑक्सिजनची पातळी ९३ पेक्षा कमी आणि ‘एचआरसीटी’चा अहवाल १०पेक्षा अधिक असेल अशा रुग्णांना ती मोफत देण्याचा विचार आहे.

– हेमंत रासने, स्थायी समिती अध्यक्ष

……………

Source link

- Advertisement -