Home ताज्या बातम्या पुणे विभागासाठी कोरोना प्रतिबंधासोबतच मान्सूनपूर्व उपाययोजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – विजय वडेट्टीवार

पुणे विभागासाठी कोरोना प्रतिबंधासोबतच मान्सूनपूर्व उपाययोजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – विजय वडेट्टीवार

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून निसर्ग चक्रीवादळ व मान्सूनपूर्व तयारीचा आढावा

पुणे,दि.7: निसर्ग’ चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर मदत देता यावी यासाठी नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्यात आले आहेत, पंचनाम्याचा अहवाल प्राप्त होताच तातडीने नुकसानभरपाईसाठीचा निधी देण्यात येणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा इतर मागास ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे सांगितले. कोल्हापूर व सांगली जिल्हयात गतवर्षीची पूरस्थिती विचारात घेवून अत्यंत काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
येथील विधान भवनच्या ‘झुंबर हॉल’मध्ये मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेले नुकसान व मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला. या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री विश्वजित कदम, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे पोलिस आयुक्त के.व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त संदिप बिष्णोई, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डिकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, मान्सूनच्या आगमनापूर्वी आवश्यक असणाऱ्या सर्व व्यवस्था विभागाने केल्या आहेत. ज्या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते, अशा ठिकाणी अधिक दक्षतेने उपाय योजना करणे आवश्यक आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने पावसाळ्याच्या सुरुवातीला नव्या 116 बचाव कार्य बोटी उपलब्ध केल्या आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्हयासाठी बोटी खरेदीसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल. गतवर्षी कोल्हापूर व सांगली जिल्हयात झालेल्या पूरस्थितीचा अनुभव विचारात घेत यावर्षी नियोजन करावे, आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात नियोजन करताना गावपातळीवर माजी सैनिकांना या कार्यात सामावून घेणे शक्य आहे, त्यादृष्टीने नियोजन करावे अशी सूचनाही त्यांनी केली.
निसर्ग’ चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळाली पाहीजे, त्यादृष्टीने तातडीने पंचनामे करून अहवाल पाठविण्याच्या सूचना देत वडेट्टीवार म्हणाले, निसर्ग’ चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या बाधित शेतक-यांचे तसेच बाधितांचे पंचनामे तातडीने करा, नुकसान भरपाईपासून कोणीही वंचीत राहणार नाही, याची दक्षता घ्या तसेच धरणातील पाणीसाठा स्थिती, तसेच पावसाळयातील दक्षता यासंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला.
राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी कोल्हापूर व सांगली जिल्हयात गतवर्षीची पूरस्थिती विचारात घेता अधिकची पोलीस यंत्रणा पावसाळयाच्या कालावधीत लागणार असल्याचे सांगितले.
विभागीय आयुक्त डॉ दिपक म्हैसेकर म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करताना गतवर्षातील त्रुटी राहणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे. गतवर्षी पुण्याबरोबरच सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हयात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे येथील नागरिकांची गैरसोय झाली होती. या वर्षी पावसामुळे अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेत नियोजन करयात आले आहे. गतवर्षी अलमट्टी धरणाचा विसर्ग न वाढल्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्हयात पूरस्थिती उद्भवली, यावर्षी याबाबतच्या दक्षतेबाबत डॉ. म्हैसेकर यांनी सविस्तर माहिती दिली.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्हयात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली. तसेच व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारे सहभागी झालेले सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर येथील जिल्हाधिका-यांनी आपापल्या जिल्हयात सुरू असलेल्या मान्सून पूर्वतयारीची माहिती दिली.
यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.