पुणे शहरात सध्या पाणीकपात नाही – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

पुणे शहरात सध्या पाणीकपात नाही – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
- Advertisement -

संभाव्य पाणीकपातीने येणाऱ्या अडचणींबाबत तांत्रिक उपाययोजनांचे सादरीकरण करण्याचे निर्देश

पुणे, दि. २६: यंदाच्या पावसाच्या अंदाज पाहता धरणातील पाणी बचत करणे आवश्यक आहे. तथापि, पुणे शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात पुढील दिवस पाणीपुरवठा विस्कळित होण्याबाबतच्या समस्येच्या अनुषंगाने तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने आठ दिवसात उपाययोजना सादर कराव्यात. तोपर्यंत शहरात पाणीकपात सुरू करण्यात येणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले.

जिल्ह्यातील प्रकल्पांची कालवे सल्लागार समिती बैठका पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे झाल्या. त्यावेळी ते बोलत होते. खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समिती बैठकीस खासदार वंदना चव्हाण, माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, आमदार माधुरी मिसाळ, राहूल कुल, भिमराव तापकीर, अशोक पवार, संजय जगताप, रवींद्र धंगेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, यंदा हवामान विभागाकडील अंदाज पाहता थोडी टंचाईची स्थिती येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली आहे. तसेच शासनपातळीवरुन विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. चाऱ्याचे नियोजन आत्ताच सुरू केले असून जवळच्या राज्यातून चारा आणण्याविषयी तयारी सुरू आहे. धरणात आहे ते पाणी ऑगस्टपर्यंत कसे पुरवता येईल यादृष्टीनेही नियोजन करण्यात येत आहे.

पुणे शहरासाठी १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले असून दर आठवड्याला एक दिवस पाणीकपात केल्यास हेच पाणी ऑगस्टपर्यंत पुरवता येऊ शकते. तथापि, एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात त्या पाठोपाठचे काही दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होतो असे लोकप्रतिनिधींची तक्रार आहे. त्यावर महापालिकेने अभ्यास करुन आठ दिवसात तांत्रिक उपाययोजनांचे सादरीकरण करावे. तोपर्यंत पाणीकपात करण्यात येणार नाही. शेतीसाठीही पुरेसा पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.

खडकवासला प्रकल्पांतर्गत नवीन मुठा उजव्या कालव्याचे दुसरे आवर्तन १ मेपासून

खडकवासला प्रकल्पातील ४ धरणात मिळून २५ एप्रिलपर्यंत ११.६१  टीएमसी पाणीसाठा आहे. त्यानुसार नियोजन करुन नवीन मुठा उजव्या कालव्याचे सिंचनासाठी १ मे ते १५ जूनपर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्याचे ठरले. पुणे महानगरपालिकेसाठी १५ जुलैपर्यंत ४.५३ टीएमसी पाणी राखून ठेवण्यात आले आहे.

बैठकीत जुना मुठा उजवा कालव्याचे अस्तरीकरण, खडकवासला प्रकल्प ते लोणी काळभोरपर्यंत नवा मुठा उजवा कालव्यासाठी बोगदा, जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या बळकटीकरण आदी अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून हिंजवडी गावातील सुविधांचा आढावा

हिंजवडी गावातील कस्तुरी चौक, वाकड उड्डाणपूलाजवळील वाढते वायरचे जाळे तसेच  लावण्यात आलेले जाहिरात फलक याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ  राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहूल महिवाल, हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नल सी.एस. भोगल, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संजय देशमुख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, या भागातील अनधिकृत जाहिरात फलक काढण्यात यावेत. आवश्यकता भासल्यास फलक काढताना स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी.  सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यासाठी नव्याने प्रस्ताव तयार करुन एमआयडीसीने संपूर्ण खर्च करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाबाबत कंत्राटदाराकडून दिरंगाई होत असल्यास संबंधितांना नोटीस बजवावी. एमआयडीसी हिंजवडी मध्ये बांधण्यात आलेला नवीन उड्डाणपूल वाहतूकीस लवकरात लवकर सुरु होईल याचे नियोजन करावे. खाजगी एजन्सीच्या माध्यमातून कचऱ्याचे व्यवस्थापन करावे, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी कचऱ्याची समस्या, वाकड चौकातील वाहतुकीची समस्या, सर्कल- नांदेड रोड, माण रोड, आदीबाबतही आढावा घेण्यात आला.

00000

- Advertisement -