Home गुन्हा पुणे शहर पोलिसांनी बनावट नोटांचे रॉकेट चालविणाऱ्याचा पर्दापाश

पुणे शहर पोलिसांनी बनावट नोटांचे रॉकेट चालविणाऱ्याचा पर्दापाश

0

दर्शन पोलीस टाइम : परवेज शेख

पुणे : विमाननगर भागातील एका बंगल्यावर छापा टाकून पुणे शहर पोलिसांनी बनावट नोटांच्या छापखान्याचा पर्दापाश केला. तसेच एका रूममध्ये तयार करून ठेवलेल्या कोट्यवधी रूपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. त्यामध्ये अमेरिकन डॉलर्ससह, एक हजार तसेच नवीन चलनातील दोन हजार आणि पाचशे रूपयांच्या बनावट नोटांचा समावेश आहे. कारवाईत सहा जणांना ताब्यात घेतले असून एक व्यक्ती भारतीय लष्करात कार्यरत असल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

घरात बनावट नोटा छापत असल्याची माहिती भारतीय सैन्यदलाच्या गुप्तचर यंत्रणेकडून पुणे शहर पोलीस दलास दोन दिवसापूर्वी मिळाली. त्यानुसार  सहआयुक्त रविंद्र शिसवे आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ४ आणि अमली पदार्थ विरोधी पथक पश्चिम पथकाने अत्यंत गोपनीयतेने विमाननगर परिसरात आरोपींच्या घराचा शोध घेत सापळा रचला तसेच संयुक्त कारवाई करीत बुधवारी दुपारी विमाननगरमधील संजय पार्क भागातील एका बंगल्यावर छापा टाकला.

बंगल्यातील एका खोलीत पोलिसांना चलनातून बाद झालेल्या एक हजार रूपये तसेच सध्या चलनात असलेल्या दोन हजार रूपये आणि पाचशे रूपयांच्या नोटा तसेच अमेरिकन डॉलर्स असा कोट्यवधी रूपयांच्या नोटांचे बंडल ठेवलेले आढळून आले. सदर चलन जप्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले त्यामध्ये सैन्यदलातील एकाचा समावेश आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत नोटांची मोजणी सुरू होती. ताब्यात घेतलेल्यांकडे चौकशी केली जात आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिली.