पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी पीएमआरडीएचा ‘मास्टर प्लॅन’ गतिमान करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. १० :- पुणे जिल्ह्याच्या नियोजित व सर्वांगीण विकासामध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, पीएमआरडीए क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज दिले.

    सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पीएमआरडीए क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतला. यावेळी पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, सह आयुक्त (प्रशासन) रुपाली आवले-डंबे, सह आयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता, प्रभारी सह आयुक्त (अनधिकृत बांधकाम) हिम्मत खराडे, महानगर नियोजनकार स्मिता कलकुटकी, मुख्य अभियंता, अभियांत्रिकी विशेष प्रकल्प रिनाज पठाण, प्रभारी मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी यांच्यासह पीएमआरडीएचे संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात ६७४ गावांचा समावेश असून, सुमारे ५,२१५ चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश आहे. पुणे महानगर प्रदेशाचा झपाट्याने होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, नागरीकरण आणि पर्यटनाच्या वाढत्या संधी लक्षात घेऊन पुढील अनेक वर्षांचा विचार करून पायाभूत सुविधांचे नियोजन करावे.

    इनर रिंग रोडसह वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर

    पुणे इनर रिंग रोड, सीएमपी कॉम्प्रेहेंसिव्ह मोबिलिटी प्लॅन अंतर्गत प्रस्तावित प्रकल्प, हिंगणगाव पूल, यवत रेल्वे ब्रिज आदी प्रकल्पांना आवश्यक ती गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुणे शहर आणि पीएमआरडीए क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध भागांना जोडणारी प्रभावी कनेक्टिव्हिटी विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मल्टिमोडल हब, औद्योगिक कनेक्टिव्हिटी, धार्मिक स्थळांची कनेक्टिव्हिटी, पर्यटन कनेक्टिव्हिटी तसेच विमानतळाशी जोडणी यांचा एकात्मिक विचार करून नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

    हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोला गती

    पुण्यातील माण–हिंजवडी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता माण–हिंजवडी–शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३चे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. या २३ स्थानकांच्या मेट्रो मार्गिकेतील १२ स्थानके पूर्ण झाली असून, आणखी ५ स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उर्वरित कामांना गती देऊन हा प्रकल्प नागरिकांच्या सेवेत लवकरात लवकर आणण्यासाठी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

    नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य

    पुणे महानगर प्रदेशातील इंद्रायणी, पवना, मुळा आणि मुठा नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठीचे प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी केवळ प्रकल्प उभारणे पुरेसे नसून, संबंधित यंत्रणा आणि संस्था स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या शाश्वत होणे आवश्यक आहे. भविष्यातील देखभाल-दुरुस्ती आणि संचालनाचा खर्चही सक्षमपणे भागवता येईल, अशा पद्धतीने प्रकल्पांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

    अग्निशमन केंद्रांचे जाळे अधिक सक्षम करण्याच्या सूचना

    पीएमआरडीए क्षेत्रातील वाढते नागरीकरण आणि लोकसंख्येचा विस्तार लक्षात घेऊन अग्निसुरक्षेची यंत्रणा सक्षम करण्यावरही बैठकीत चर्चा झाली. कासार आंबोली येथील अग्निशमन केंद्राचे काम प्रगतीपथावर असून, आणखी १२ अग्निशमन केंद्रे प्रस्तावित आहेत. या केंद्रांच्या कामांना आवश्यक ती गती देऊन पीएमआरडीए क्षेत्रातील नागरिकांना तत्पर अग्निशमन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

    वाढत्या लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याचे दीर्घकालीन नियोजन

    पीएमआरडीए क्षेत्रात वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि भविष्यातील नागरी विस्तार लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आतापासूनच दीर्घकालीन नियोजनातून सोडवावा त्यासाठी नवीन पाण्याची स्त्रोत उपलब्ध करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नवीन नागरी वसाहती, औद्योगिक क्षेत्रे, पर्यटनस्थळे आणि वाढणाऱ्या लोकसंख्येला आवश्यक पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी उपलब्ध जलस्रोत, वितरण व्यवस्था आणि भविष्यातील गरजा यांचा एकत्रित विचार करून नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

    पुणे महानगर प्रदेशाचा विकास हा केवळ रस्ते आणि इमारतींपुरता मर्यादित न राहता वाहतूक, पाणी, पर्यावरण, अग्निसुरक्षा, उद्योग, पर्यटन आणि नागरिकांच्या जीवनमानाचा सर्वंकष विचार करणारा असावा, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी दिल्या.
    0000

    - Advertisement -