Home गुन्हा पुण्यातील आंबेगाव येथे भिंत कोसळून ६ जणांचा मृत्यु

पुण्यातील आंबेगाव येथे भिंत कोसळून ६ जणांचा मृत्यु

पुणे : वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजच्या आवारातील सीमाभिंत कामगारांच्या पत्र्यांच्या घरावर कोसळून झालेल्या अपघातात ६ कामगारांचा मृत्यु झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. ३ कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

राधेलाल पटेल (वय २५), जेटूलाल पटेल (वय ५०), ममता राधेलाल पटेल (वय २२), जितू चंदन रवते (वय २४), ममता पटेल (वय २४) अशी मृत पावलेल्या कामगारांची नावे असून ते सर्व छत्तीसगड येथील राहणारे आहेत.

याबाबत अग्निशामक दलाकडून दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ही सीमाभिंत आहे. त्याच्या शेजारीच असलेल्या मोकळ्या जागेत नवी बांधकाम सुरु आहे. भिंतीच्या कडेला या बांधकामावरील मजूरांसाठी पत्र्याच्या शेड बांधण्यात आल्या होत्या. त्यात हे मजूर रहात होते.


गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे ही सीमा भिंत कोसळली. त्याचबरोबर येथील एक झाडही उन्मळून भिंतीवर पडले. त्यामुळे भिंतीचा हा सर्व मलबा खाली असलेल्या झोपड्यांवर पडला. अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी भिंतीचा ढिगारा काढून लोकांना बाहेर काढले. त्यातील पाच जणांचा जागीच मृत्यु झाला होता


गेल्या शनिवारी कोंढवा येथे अशाच प्रकारे अ‍ॅल्कोन स्टायलश या सोसायटीची सीमाभिंत कोसळून त्यात १५ कामगारांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर पुणे महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बांधकाम मजूरांच्या सुरक्षितेसाठी उपाया योजना सुरु करण्याचा आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यानंतर पुन्हा ही घटना घडली आहे.